अवयवदानाने तिघांच्या जीवनात आशेचा "किरण'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

लातुरात प्रथमच ग्रीन कॉरिडॉर यशस्वी

लातुरात प्रथमच ग्रीन कॉरिडॉर यशस्वी
लातूर - कपडे वाळत घालण्यासाठी घरावर चढलेल्या किरण सुनील लोभे (वय 19) हा तरुण विजेचा धक्का बसला म्हणून खाली पडला. डोक्‍याला मार लागल्याने त्याच्यावर येथे उपचार सुरू होते. सोमवारी (ता. 25) त्याच्या मेंदूचे कार्य (ब्रेनडेड) थांबले. त्यानंतर त्याच्या अवयवदानाला तीन भावांची संमती घेण्यात आली. मंगळवारी दुपारी किरणचे हृदय घेऊन विमानाने मुंबईकडे झेप घेतली. तर दोन मूत्रपिंडे घेऊन मोटार औरंगाबादला रवाना झाली. किरणच्या अवयवदानाने लातुरात इतिहास घडविला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते विमानतळ हे अंतर 17 किलोमीटरचे आहे; पण पोलिसांनी उभ्या केलेल्या "ग्रीन कॉरिडॉर'मुळे केवळ नऊ मिनिटांत किरणचे हृदय विमानतळापर्यंत पोचले. त्याचे हृदय नेताना त्याच्या आईने केलेला आक्रोश सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. किरणच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. गरीब परिस्थितीमुळे किरणही इतर भावांप्रमाणेच मिळेल तो रोजगार करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलत होता. 15 सप्टेंबर रोजी कपडे वाळत घालण्यासाठी घरावर चढला होता. त्या दिवशी पाऊस झाला होता.

त्यामुळे पत्र्यात अर्थिंग उतरून त्याला विजेचा धक्का लागला. तो वरून खाली पडला. तातडीने त्याला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी किरणला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दहा दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. काल त्याच्या मेंदूचे कार्य थांबल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. त्यानंतर अवयावदान करण्यात आले.

मुंबईतील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ हार्ट येथील एका रुग्णाला किरणचे हृदय बसविले जाणार आहे. औरंगाबाद येथील कमलनयन बजाज रुग्णालय व एमजीएम रुग्णालयातील प्रत्येकी एका रुग्णावर मूत्रपिंडरोपण करण्यात येणार आहे. किरणचे यकृतही दान केले जाणार होते; पण मुंबईच्या जसलोक रुग्णालयाच्या डॉक्‍टरांच्या पथकाचे विमान लातूरला हवामान चांगले नसल्याच्या कारणावरून नांदेडला उतरले. तेथून मोटारीने यकृत नेणे शक्‍य नव्हते. त्यामुळे यकृत दान होऊ शकले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur marathwada news life saving by body part donate