अंध पेटकर कुटुंबाला मिळाले मिरची कांडप यंत्र

प्रा. डॉ. रवींद्र भताने 
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

चापोली - येथील सुलोचनाबाई पेटकर यांच्या अंध कुटुंबाची व्यथा ‘सकाळ’मधे गुरुवारी (ता. १३ जुलै) प्रकाशित झाल्यानंतर याची दखल घेत जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रकाश देशमुख यांनी बुधवारी (ता. दोन) या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी मिरची कांडप यंत्र दिले.

चापोली - येथील सुलोचनाबाई पेटकर यांच्या अंध कुटुंबाची व्यथा ‘सकाळ’मधे गुरुवारी (ता. १३ जुलै) प्रकाशित झाल्यानंतर याची दखल घेत जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रकाश देशमुख यांनी बुधवारी (ता. दोन) या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी मिरची कांडप यंत्र दिले.

येथील सुलोचनाबाईंचे कुटुंब मोठ्या जिद्दीने व कष्टाने आपले जीवन जगत आहे. त्यांची दखल आजपर्यंत कोणीच घेतली नव्हती. ‘सकाळ’मध्ये (गुरुवार, ता. १३ जुलै) या कुटुंबाची व्यथा प्रकाशित झाल्यावर मदतीचे हात पुढे येत आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी त्यांचे वैद्यकीय उपचाराचे पालकत्व स्वीकारले आणि सभापती प्रकाश देशमुख यांनी बुधवारी (ता. दोन) कुटुंबाला भेट देऊन मदतीचा हात पुढे केला. कुटुंबातील सून व नातवंडे वगळता सर्वजण अंध आहेत. गावात घरोघरी जाऊन भांडी घासून हे कुटुंब आपली उपजीविका भागवीत आहे. सभापती देशमुख यांनी या कुटुंबाला स्वावलंबी बनविण्यासाठी मिरची कांडप यंत्र दिले आहे. जिल्हा परिषद सदस्य अरुणा कांबळे, मारुती मुर्गे, जिलानी शेख, रमेश कुलकर्णी, रामराव पाटील, प्रभाकर होनराव, रमेश पाटील, विक्रम चाटे, सिद्धेश्वर होणराव, बालाजी शेवाळे, शेखर पाटील, चांद शेख, शिवा भिसे, शेख महेबूब उपस्थित होते.

‘सकाळ’मध्ये सुलोचनाबाईंच्या कुटुंबाची व्यथा वाचून या कुटुंबासाठी काहीतरी मदत करावी ही भावना निर्माण झाली. या कुटुंबाला स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांनी घरगुती उद्योग सुरू करावा यासाठी त्यांना मिरची कांडप यंत्र दिले आहे. यातून त्यांना नक्कीच उत्पन्नाचा मार्ग निघेल.
- प्रकाश देशमुख, बांधकाम व आरोग्य सभापती.

सभापती साहेबांनी माझ्या कुटुंबाला घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी मिरची कांडप यंत्र दिल्यामुळे माझ्या कुटुंबासाठी उत्पन्नाचा नवीन मार्ग मिळाला आहे. ‘सकाळ’मुळेच माझ्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्वजण पुढे येत आहेत. ‘सकाळ’ व सभापती देशमुख यांचे मी आभार मानते.
- सुलोचनाबाई पेटकर, चापोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur news blind pethkar family Chilli conductor machine