esakal | तीस गुंठ्यांत झाली चार लाखांची कमाई
sakal

बोलून बातमी शोधा

तीस गुंठ्यांत झाली चार लाखांची कमाई

तीस गुंठ्यांत झाली चार लाखांची कमाई

sakal_logo
By
जलील पठाण

औसा - एकीकडे तालुक्‍यात आणि जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिकांवर नांगर फिरविला जात असताना पिकांमध्ये बदल करून लाखोंचे उत्पादन घेता येते हे एका दूधवाल्याने सिद्ध करून दाखविले आहे. दररोज सकाळी दुधाचे कॅन घेऊन दूध वाटप करणाऱ्या या दूधवाल्याच्या टोमॅटोची चर्चा तालुक्‍यात सुरू असून, केवळ तीस गुंठ्यांत चार लाखांची कमाई झाल्याने या दूधवाल्याला टोमॅटोमध्ये लॉटरीच लागली आहे.

जूननंतर पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्‍यातील खरीप पिकांनी माना टाकल्या, तर काही पिके पाण्याअभावी जागेवर करपून गेली. पारंपरिक पिकांच्या मागे न लागता व कमी खर्चातही चांगले उत्पादन घेण्याच्या उद्देशाने टेंभी (ता. औसा) येथील दुधाचा व्यवसाय करणाऱ्या मुज्जमील सय्यद या तरुणाने आपल्या शेतात तीस गुंठे टोमॅटोची लागवड केली. शेतीचे अपुरे ज्ञान असूनही त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार टोमॅटोची शेती फुलविली. गेल्या दोन वर्षांपासून घसरलेले टोमॅटोचे दर यंदा चांगलेच वधारले. खते, कीडनाशक व बुरशीनाशकांच्या फवारण्या आणि पाण्याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन केल्यामुळे त्यांना या तीस गुठ्यांवर फक्त तीस हजार खर्च आला आहे. सुरवातीला त्यांना टोमॅटोच्या एका कॅरेटला हजार ते बाराशे दर मिळाला; परंतु तेव्हा उत्पादन कमी नघत होते. नंतर मात्र उत्पादनातही भरघोस वाढ झाली, दर काहीसे कमी झाले. त्यांनी सरासरी आठशे रुपये दराने आतापर्यंत पाचशेहून अधिक कॅरेटची विक्री केली आहे. आता या तीनशे ते साडेतीनशे कॅरेट उत्पादन होण्याची त्यांना खात्री आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करताना नावीन्याचा शोध घेत आधुनिक पद्धतीने पिकांमध्ये फेरपालट केल्याने त्यांना या टोमॅटोच्या शेतीतून चांगला आर्थिक नफा झाला आहे. ठिबक सिंचन व मांडवाचा वापर करून त्यांनी टेभी येथील भारत नर्सरीकडून रोपे घेतली व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही टोमॅटोची शेती केली. कष्ट करण्याची तयारी, जिद्द आणि उत्कट इच्छा याच्या जोरावर पुरेसे ज्ञान नसतानाही मुज्जमीलने चार लाखांचे उत्पादन घेऊन शेती फायद्याची कशी आहे, हे दाखवून दिले आहे.

दररोज सकाळी शहरातील घराघरांत दूध वाटप करतो. माझ्याकडे असलेल्या थोड्या शेतीत नवीन प्रयोग करण्याची इच्छा असल्याचे मी भारत नर्सरीचे मालक आस्लम सय्यद यांच्याकडे बोलून दाखविल्यावर त्यांनी मला टोमॅटो लागवडीचा सल्ला दिला आणि त्याबाबत मार्गदर्शनही केले. केवळ तीस हजारांच्या घरात उत्पादन खर्च झाला असून या तीस गुंठे रानात मला चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. पारंपरिक शेतीच्या मागे न लागता पिकांमध्ये बदल करून शेतीत यशस्वी होता येते हे मला या प्रयोगातून शिकायला मिळाले.
- मुुज्जमील सय्यद, टेभी (ता. औसा)

loading image