निलंग्याच्या पाणंदमुक्तीसाठी पुणेकरांचा पुढाकार

विकास गाढवे
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

लातूर - स्वतःचा जिल्हा पाणंदमुक्त करून आलेल्या पुणेकरांनी मागील महिनाभरापासून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा निलंगा तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी जीव ओतला आहे. पुण्याच्या अकरा जणांच्या पथकाने तालुक्‍यातील मोठ्या वीस गावांत पाणंदमुक्तीला चालना दिली असून या गावांत दोन हजार स्वच्छतागृहांची उभारणी पूर्ण केली आहे. पथकांतील कर्मचाऱ्यांमुळे निलंगा तालुक्‍यात स्वच्छ भारत मिशनला मोठे बळ आले आहे. यातूनच निलंगा पंचायत समितीने केवळ तीन दिवसात साडेअकरा हजार स्वच्छतागृहाचे खड्डे खोदले आहेत.   

लातूर - स्वतःचा जिल्हा पाणंदमुक्त करून आलेल्या पुणेकरांनी मागील महिनाभरापासून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा निलंगा तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी जीव ओतला आहे. पुण्याच्या अकरा जणांच्या पथकाने तालुक्‍यातील मोठ्या वीस गावांत पाणंदमुक्तीला चालना दिली असून या गावांत दोन हजार स्वच्छतागृहांची उभारणी पूर्ण केली आहे. पथकांतील कर्मचाऱ्यांमुळे निलंगा तालुक्‍यात स्वच्छ भारत मिशनला मोठे बळ आले आहे. यातूनच निलंगा पंचायत समितीने केवळ तीन दिवसात साडेअकरा हजार स्वच्छतागृहाचे खड्डे खोदले आहेत.   

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्हा पाणंदमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात मोठी चळवळ सुरू आहे. देवणी, जळकोट व शिरूर अनंतपाळ हे तीन लहान तालुके पाणंदमुक्त केल्यानंतर जिल्हा परिषदेने मोठ्या तालुक्‍यांना लक्ष्य केले आहे. यात पालकमंत्र्यांचा निलंगा तालुका पहिल्यांदा पाणंदमुक्त करण्याचा चंग अधिकाऱ्यांनी बांधला आहे. राज्यपातळीवरही पाणंदमुक्तीत मागे राहिलेल्या जिल्ह्यांना पुढे खेचण्याचे काम सुरू आहे. यातूनच पाणंदमुक्त जिल्ह्यांतील स्वच्छ भारत मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागे पडलेल्या जिल्ह्यांत पाठवले जात आहे. पुण्याच्या स्वच्छ भारत मिशनच्या कक्षातील अकरा जणांची नियुक्ती लातूर जिल्ह्यासाठी करण्यात आली असून हे कर्मचारी मागील महिन्यापासून निलंगा तालुक्‍यातील वीस गावांत पाणंदमुक्तीसाठी अहोरात्र काम करत आहेत. निलंगा तालुक्‍यातील ३९ गावे पाणंदमुक्त झाली असून ७७ गावे पाणंदमुक्तीच्या मार्गावर आहेत. यात ५७ गावांत दहा हजार तर वीस मोठ्या गावांत दहा हजार स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर तालुका पाणंदमुक्त होणार आहे. यातूनच मोठ्या वीस गावांची जबाबदारी या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी मोठ्या गावांत पाणंदमुक्तीला चालना देत महिनाभरात दोन हजार स्वच्छतागृहांची उभारणी पूर्ण केली आहे. कर्मचाऱ्यांत पुणे जिल्हा कक्षातील काळूराम डांगले व विक्रम शिंदे तर तालुका पातळीवरील गटसमन्वयक पंकज चौधरी, संदीप गुरव, चैतन्य पाटील, रेवणसिद्ध सोलापुरे, सरफराजखाँ तडवी, मंगेश थोरात, जगदीश घाडगे, प्रशांत कुलकर्णी व विशाल चुंबळे यांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या पाणंदमुक्तीतील अनुभवाचा चांगला फायदा झाला. बेसलाईन सर्वेक्षणातील चुकांची तातडीने दुरुस्ती झाली. शंभर टक्के कुटुंबांना भेटी दिल्या. चारशेपेक्षा जास्त कुटुंबांच्या गावांना पाणंदमुक्त करण्याचे मोठे आव्हान होते. या गावांतच अकरा कर्मचाऱ्यांनी चांगले वातावरण तयार केले आहे. गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी जवळीक वाढवली. त्यांच्यामुळे तालुक्‍यात पाणंदमुक्तीच्या प्रयत्नांना चांगले बळ मिळाले आहे.  
- राजकुमार मुक्कावार, गटविकास अधिकारी, निलंगा.

निलंगा तालुक्‍यातील लोक खूप चांगले आहेत. सीमा व भौगोलिक अडचणी असल्या तरी ग्रामस्थांची पाणंदमुक्तीसाठी तयारी आहे. यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचणे आवश्‍यक आहे. टीमवर्कच्या माध्यमातून हे काम करता आले. पुणे जिल्ह्यातील फार्म्युला आम्ही इथे उपयोगात आणला. ग्रामस्थांनी पाणंदमुक्तीच्या प्रयत्नाला दिलेल्या प्रतिसादामुळे कामाचे समाधान मिळत आहे.
- काळूराम डांगले, मनुष्यबळ विकास सल्लागार, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur news nilanga sanbhaji patil nilangekar