झाड लावू आणि जगवू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

प्रत्येक नागरिकाने सामाजिक दायित्वतेच्या भावनेतून पर्यावरण रक्षणासाठी एक तरी झाड लावून जगवले पाहिजे. आमच्या झाडे वाचवा ग्रुपचा हाच प्रयत्न आहे. अनेकांनी सामाजिकतेचा वसा घेतला पाहिजे. उद्यानांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवून उद्यानांना पावसाचे पाणी कसे देता येईल याचे प्रात्यक्षिकही पालिकेला दाखवले आहे.

- प्रवीण बारवे, सदस्य, सेव्ह ट्री ग्रुप नेरूळ

नेरूळ - निसर्ग आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी येथील काही नागरिकांनी सेव्ह ट्री ग्रुपच्या वतीने ‘झाडे लावा, झाडे वाचवा’चा संदेश देत परिसरातील २०० झाडांची निगा व त्यांची जोपासना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार झाडांना पाणी घालण्याचे काम ही मंडळी करते.

पर्यावरण समतोलासाठी झाडे जगवली पाहिजेत. त्यासाठी नेरूळ परिसरातील मंडळी झाडे वाचवण्याचा प्रयत्न करताहेत. प्रवीण बारवे, सुरेंद्र झापर्डे, शिवाजी शिंदे, नरेंद्र मखीजानी ही मंडळी दररोज नेरूळ सेक्‍टर १९ मधील नूतन विद्या मंदिर ते वंडर्स पार्कच्या बाजूला सर्व्हिस रोडलगतच्या जवळजवळ २०० झाडांची निगा राखत आहेत. रोज सकाळी व सायंकाळी या परिसरात मॉर्निंग व इव्हनिंग वॉक करताना झाडांना पाणी घालण्याचे काम ते करत आहेत. छोट्या झाडांना काठ्या रोवून आधार दिला जात आहे. काठ्यांना प्लास्टिकच्या उलट्या बाटल्या बांधून त्यात पाणी टाकत आहेत. या परिसरातील नागरिकांनाही ते झाडांना पाणी घालण्याची विनंती करतात. त्यामुळे पर्यावरणप्रेमी घरातून येतानाच पाणी घेऊन येतात व झाडांना घालतात. ग्रुप दर रविवारी सामुदायिक श्रमदान करून झाडांची काळजी घेत आहे. प्रत्येक झाडाला एका नागरिकाचे नाव दिल्याने ते आपल्या झाडाची काळजी घेतात. झाडांना नियमित पाणी देण्यासाठी सेव्ह ट्री ग्रुपने पाण्याची टाकी विकत घेतली आहे. सोसायट्यांतील नागरिक या प्लास्टिकच्या टाकीत थोडे थोडे पाणी टाकतात. त्यानंतर ट्रॉलीवरील या टाकीतील पाणी परिसरातील झाडांना घातले जाते. सामाजिक भावनेतून झाडे वाचवण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.

Web Title: Let the tree plant and live