खरंच डॉक्‍टरांचे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 November 2019

ससून रुग्णालयाच्या रुग्णसेवेचा दर्जा उंचावल्याने या आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

पुणे - ‘मी ससून रुग्णालयाचे उपचार आयुष्यात विसरू शकणार नाही. डॉक्‍टरांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत...,’’ ससून रुग्णालयात तिसरे यशस्वी यकृत प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाचा भाऊ बोलत होता...

या रुग्णालयाने भावाचे प्राण वाचविल्याचे समाधान त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होते. ‘‘खासगी रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपणाचा खर्च आम्हाला परवडण्यासारखा नव्हता. वर्तमानपत्रांमधून ससूनमधील यशस्वी प्रत्यारोपणाच्या बातम्या वाचल्या, त्यातून उपचारांसाठी येथे आलो,’’ असे लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे राहणाऱ्या रुग्णाच्या भावाने सांगितले. 

‘आम्ही शेतकरी. गाठी खूप पैसा नाही. अशातच यकृताचा आजार झाला. यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेसाठी अनेक खासगी रुग्णालयांत चौकशी केली. तेथील खर्च २० ते २५ लाख रुपयांपर्यंत असल्याचे समजले. तो आवाक्‍याबाहेर होता. याच दरम्यान ससून रुग्णालयातही ही सुविधा असल्याचे वाचनात आले, त्यामुळे येथे संपर्क साधला. त्यातून ही शस्त्रक्रिया येथे झाली,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. बिपिन विभुते, डॉ. कमलेश बोकील, डॉ. दिनेश झिरपे, डॉ. संतोष थोरात, डॉ. अभिजित माने, डॉ. शीतल धडपळे, डॉ. शशिकला सांगळे, डॉ. वंदना दुबे, भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. विद्या केळकर, डॉ. योगेश गवळी, डॉ.
हरीश टाटीया यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: liver transplant in sasoon hospital success lifesaving