Women's Day : मोलकरणीच्या लेकीचा सीएपर्यंतचा प्रवास

नीला शर्मा
Sunday, 8 March 2020

भटकंती, शास्त्रीय संगीत, पर्यावरण, बालशिक्षण आदी विविध क्षेत्रांमध्ये मौलिक कामगिरी करणाऱ्या काही यशस्विनींप्रमाणेच शून्यापासून यशाच्या नवनव्या पायऱ्या चढत जाणारी मोलकरणीची लेक या ‘चौकटीपलीकडल्या’ मैत्रिणींना भेटूया. महिला दिनानिमित्त (आठ मार्च) आजपासून सुरू होणाऱ्या खास लेखमालेतून त्यांच्याविषयी जाणून घेऊया...

धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणीची लेक सीए (चार्टर्ड अकाउंटंट) होते. तेवढंच फक्त नाही ज्या फर्ममध्ये ती उमेदवारी करत होती, तिथेच भागीदार होऊन नाव कमावते, ही कादंबरी किंवा चित्रपटाची कथा नाही. कल्पना दाभाडे यांनी हे उदाहरण प्रत्यक्षात आणले आहे. पदवीनंतर पंधरा वर्षांच्या अंतराने त्या या अभ्यासाकडे वळल्या हे विशेष.

अत्यंत हालअपेष्टांचे अडथळे ओलांडत कल्पना दाभाडे यांनी सीए होण्यापर्यंत केलेला प्रवास आश्‍चर्यकारक आहे. त्या म्हणाल्या, ‘आई पन्नाशीला आल्यावर माझा जन्म झाला. एकुलती म्हणून आईचा माझ्यावर अतोनात जीव होता. वडील दारूच्या नशेत असायचे. एका कंपनीत वॉचमनची नोकरी करताना रात्री चोरी झाली, तिचा आळ त्यांच्यावर आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘चोराची बायको मोलकरीण म्हणून नको,’ असं म्हणत लोकांनी तिलाही कामावरून काढून टाकलं. दुसऱ्या जागी जाऊन तिनं कामं मिळवली; पण हिची छोटी पोरगी मागेमागे असते या कारणाने लोक काम नाकारत. ती कसंबसं मला एखाद्या कोपऱ्यात, अंगणात किंवा ओट्यावर बसवून घाईने कामं निपटून यायला बघायची. एकदा ती लवकर आली नाही म्हणून मी रडत ती होती त्या घरात जाऊ लागले तर घरमालकिणीने माझ्यावर कुत्रं सोडलं. त्याने मला ओरबाडलं.’

त्या भयंकर आठवणींनी आजही कल्पनाताईंना रडू फुटतं. ते आवरून त्या पुढे सांगू लागल्या, ‘आईने मला सुरक्षित ठेवता यावं, माझं शिक्षण व्हावं, या चक्रातून बाहेर पडून मला सुखी आयुष्य जगता यावं यासाठी लोकांना माहिती विचारली. शासकीय निरीक्षणगृहात माझी व्यवस्था झाल्यावर तिच्या जीवात जीव आला. माझी रवानगी वेगवेगळ्या आधारगृहांमध्ये झाली; पण शिक्षण सुरू राहिलं. पदवी शिक्षणाच्या व नंतरच्याही काळात छोट्या नोकऱ्या केल्या. आता आईची जबाबदारी मी घेतली होती.

लातूरच्या एका स्वयंसेवी संस्थेत काम करताना एक सीए म्हणाले, ‘तू किती हिशेब ठेवून आम्हाला व्यवस्थित माहिती देतेस? तू सीए व्हायला हवीस.’ ती ठिणगी मनात पडली आणि मी तो ध्यास घेतला. पदवीनंतर तब्बल वीस वर्षांच्या अंतराने हा नवा, अवघड अभ्यास सुरू केला. तीनदा परीक्षा दिल्यावर पास झाले. उमेदवारी केली त्या फर्मनेच भागीदार करून घेतलं. दरम्यान, कळलं की वडील शिवाजीनगर परिसरात भीक मागत आहेत. शोध घेऊन त्यांना एका वृद्धाश्रमात राहायला नेलं. आई-बाबा दोघेही आता नाहीत; पण मोजता येणार नाहीत इतका गोतावळा आहे. विद्यार्थी सहायक समिती, वनस्थळी अशा संस्थांबरोबर काम केलं. आजही काही ठराविक वेळ त्यांच्यासाठी राखीव ठेवते.’ 

निराधार बालकांना मदत व्हावी या उद्देशाने ‘अक्षरानंद’ हा न्यास सुरू केला आहे. अजून पुष्कळ वाटचाल करायची आहे. आई माझ्यासाठी ज्याची इच्छा करत होती, ते समाधानी आयुष्य प्रामाणिकपणे काम करण्यातून मी मिळवते आहे, असेही त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maid daughter success ca journey