डॉक्‍टरांच्या माणुसकीने "आरती' पुन्हा ठणठणीत 

गोकुळ खैरनार
रविवार, 21 जानेवारी 2018

कुटुंबाची उपजीविका हातावरची. आम्ही मुंबईही पाहिली नाही. डॉ. देवरे व डॉ. साळुंके यांनी त्यांच्या गाडीतून आरती व आम्हाला वेळोवेळी दवाखान्यात घेऊन गेले. हे डॉक्‍टर आमच्यासाठी देवदूत आहेत. सामान्य रुग्णालयाचे डॉ. डांगे यांचे मोठे सहकार्य मिळाले. सर्वांचे आभारी आहोत. आरती इतर मुलींसारखी ठणठणीत होणार असल्याने आनंदी आहोत. 
- शंकर राखपसारे, आरतीचे वडील 

मालेगाव - येथील कॅम्प भागातील आरती शंकर राखपसारे (वय 12) या मुलीवर आठवड्यापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झाली. अत्यंत गरीब परिस्थितीतील राखपसारे कुटुंबीयांना शस्त्रक्रियेपर्यंतच्या सहा वर्षांच्या प्रवासात मदत करणारे येथील सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश देवरे व डॉ. सचिन साळुंके हे "देवदूत'च ठरले आहेत. मुंबईत शस्त्रक्रिया केल्यानंतर आरतीला बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. 

सन 2010 मध्ये भायगाव शिवारातील नवीन प्राथमिक मराठी शाळेत मुलांची वैद्यकीय तपासणी करताना डॉ. देवरे यांना पहिलीतील आरतीच्या हृदयारोगाबाबत निदान झाले. यानंतर तिची सोनोग्राफी व 2 डी इको या तपासण्या केल्या. मात्र, आजाराचे नेमके निदान होण्यासाठी आणखी तपासण्यांची गरज होती. आरतीचे वडील शंकर राखपसारे व भाऊ प्रशांत हमाली करतात. आई धुणीभांडी करते. अशा परिस्थितीत डॉ. देवरे व डॉ. साळुंके यांनी पदरमोड करत स्वत:च्या वाहनातून आरतीला मुंबईतील सह्याद्री तेरणा हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलच्या चॅरिटेबल ट्रस्टकडून तिच्या मोफत तपासण्या केल्या. यात आरतीवर ओपन हार्ट सर्जरी करण्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेसाठी तीन-साडेतीन लाखांचा खर्च राखपसारे कुटुंबीय करू शकणार नव्हते. यामुळे सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे ठरवत डॉ. साळुंके यांनी विविध कागदपत्रांची जमवाजमव केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्रालयात चकरा मारल्या. टाटा ट्रस्ट, सिद्धिविनायक ट्रस्ट व एसआरसीसीएनएच हॉस्पिटल (मुंबई) यांच्याकडे कागदपत्रे सादर केली. पाठपुराव्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, टाटा ट्रस्ट, सिद्धिविनायक ट्रस्ट व एसआरसीसीएनएच हॉस्पिटल या सर्वांच्या सहकार्याने आरतीवर रक्षा कॅम्पअंतर्गत यशस्वी शस्त्रक्रिया झाली. या प्रवासात दोघा डॉक्‍टरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीप्रमुख ओमप्रकाश शेटे, मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते राजेश सोनार, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. स्मिता देवरे यांचे सहकार्य मिळाले. राखपसारे यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे. पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, असा परिवार आहे. दिवसभर कष्ट केले तर सायंकाळी चूल पेटते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केवळ डॉक्‍टरांच्या पाठपुराव्यामुळे आरतीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यासाठी तिचा मोठा भाऊ प्रकाश याचेही प्रयत्न कामी आले. 

आरतीवर ओपन हार्ट सर्जरी करण्याचे आव्हान होते. तिची कागदपत्रे तयार केली. खूप अडचणी आल्या. सामाजिक संस्थांकडे सादर केल्यानंतर त्यांच्या बैठकांना उपस्थित राहिलो. आरतीवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा आनंद आहे. सामाजिक भावनेतून मदत केली. राजकीय स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत मालेगाव शहर व तालुक्‍यात 110 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया गेल्या तीन वर्षांत झाल्या. आरतीच्या शस्त्रक्रियेसाठी तिच्या भावाची धडपड मोलाची ठरली. 
- डॉ. दिनेश देवरे, डॉ. सचिन साळुंके 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malegaon news doctor Humanity Open Heart Surgery