सोळा वर्षांनंतर दहावी पास होण्याचे स्वप्न साकार

कृष्णकांत कोबल
रविवार, 24 जून 2018

मला शिक्षणाची आवड आहे. मात्र, परिस्थितीमुळे खूप मर्यादा आल्या. त्यामुळे पुढील शिक्षण घेणे शक्‍य झाले नाही. शैक्षणिक वातावरणात काम करत असल्याने पुन्हा प्रेरणा घेऊन मी दहावीची परीक्षा दिली आणि यशस्वी झाले. पुढे मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार आहे. 

- मनीषा रासकर-वाघ 

मांजरी - जिद्द, चिकाटी व महत्त्वाकांक्षा असेल, तर आपली स्वप्ने केव्हाही साकार होऊ शकतात. येथील मनीषा रासकर-वाघ यांनी दहावी पास होण्याचे पाहिलेले स्वप्न जिद्दीच्या जोरावर तब्बल सोळा वर्षांनी प्रत्यक्षात उतरवले आहे. 

मनीषा यांचे 2002 मध्ये लग्न होऊन संसाराची जबाबदारी आल्याने त्यांचे पुढील शिक्षण बंद झाले होते. त्याची खंत त्यांच्या मनाला कायम टोचत राहिली. कौटुंबिक जबाबदारी व आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही त्या पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हत्या. मगर महाविद्यालयात त्या रोजंदारीवर सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. तेथील शैक्षणिक वातावरण पाहून पुढे शिकायचा विचार त्यांच्या मनामध्ये आला.

त्यानंतर त्यांनी मागील वर्षी सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. दररोजचे काम, कौटुंबिक जबाबदारी व खानावळ चालवून त्यांनी जिद्दीने अभ्यास केला व या परीक्षेत 56.40 टक्के गुण मिळवून त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manisha Raskar Wagh passed 10th after 16 years