राडारोड्यातून होणार वीटनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

पिंपरी - देशातील सर्वांत झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची नोंद झाली आहे. मात्र, त्यापाठोपाठ नैसर्गिक साधनसंपत्तीची होणारी अतिरेकी लूट आणि राडारोडा निर्मितीचे वाढते प्रमाण ही समस्या शहरासमोर आहे. त्यावरील उपाययोजनेचे महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी या राडारोड्याच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची वीट तयार होऊ शकतात व त्याचा वापर बांधकामासाठी करता येऊ शकतो, असे संशोधन निगडीतील सहावीत शिकणाऱ्या आर्यन दहिवालने केले आहे. या संशोधनाने राज्य पातळीवरील प्रतिथयश होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले आहे. 

शहरात सातत्याने होणारी बांधकामे, त्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा मोठा वापर, बांधकाम नूतनीकरण आणि बांधकाम हटविल्याने त्यातून निर्माण होणारा राडारोडा यावर आधारितच आर्यनने हे संशोधन केले आहे. या संशोधनाअंतर्गत त्याने राडारोड्यापासून तयार केलेल्या विटेला योग्यता तपासणीअंती प्रमाणपत्रही मिळाले आहे. त्यातूनच स्पर्धेमध्ये सादर केलेल्या संशोधन निबंधाला परीक्षकांनी विशेष पसंती दर्शविली असून, या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा पिंपरी-चिंचवड शहरातील यंदाचा तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे. 

‘मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन’तर्फे (एमएसटीए) सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ही राज्यस्तरीय स्पर्धा घेतली जाते. शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, कल्पनाशक्तीला वाव देणे, त्यांच्यातील संशोधन कौशल्य वाढविणे, हा त्यामागील उद्देश आहे. तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये या वर्षी ६० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिल्या शंभर गुणांच्या लेखी परीक्षेत ८५ गुण मिळवून आर्यन पुढच्या पातळीवर पोचला होता. त्यानंतर झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षेतही यशस्वी होत त्याने अंतिम टप्पा गाठला. ‘ॲक्‍शन रिसर्च प्रोजेक्‍ट’ असे या अंतिम परीक्षेचे स्वरूप होते. त्यासाठी ‘कचरा प्रक्रिया व पुनर्वापर’ विषय दिला गेला होता. आजूबाजूला दिसणाऱ्या राडारोड्यामुळे व्यथित झालेल्या आर्यनने ‘बांधकाम कचरा’ हा विषय निवडला. 

आर्यनपाठोपाठ सिटी प्राइड स्कूलमधील सहा विद्यार्थ्यांनी रौप्य आणि एका विद्यार्थ्याने ब्रांझपदक जिंकले असून सर्वाधिक पदे मिळवून ‘विक्रम साराभाई पुरस्कार’ जिंकणारी ही पुणे विभागातील एकमेव शाळा ठरली आहे.
- डॉ. अश्‍विनी कुलकर्णी, संचालिका, सिटी प्राइड स्कूल 

असे केले संशोधन
दगडखाण, बांधकामे, डंपिंग ग्राउंड, नदीकाठांना भेट 
महापालिकेतील पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीशकुमार खडके यांच्या मुलाखती
बांधकाम राड्यारोड्यापासून वीट बनविण्याचा निर्णय 
बांधकाम अभियंता वडील सारंग दहिवाल यांचे मार्गदर्शन

संशोधनातील निरीक्षणे
पिंपरी-चिंचवडमध्ये रोज दोनशे टन राडारोडा निर्मिती
त्यापैकी ७० टक्के कचरा बांधकाम पाडापाडीतून
राडारोड्यात विटांचे प्रमाण सर्वाधिक ३५ टक्के
सिमेंटचे प्रमाण ३० टक्के
स्टीलचे प्रमाण १५ टक्के
सिरॅमिक, काच आणि लाकूड प्रत्येकी ५ ते १५ टक्के
लाल विटेपेक्षा कमी खर्च
लाल वीट दर ८ रुपये, राडारोड्याची वीट सुमारे पाच रुपये

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Aryan Dahival pimpri Brick making