शोषित महिलांच्या आधारवड 

विकास गावकर
गुरुवार, 11 जानेवारी 2018

व्यसनाधीनता, संशय, विवाहबाह्य संबंध अशा कितीतरी कारणांमुळे उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेले शेकडो संसार पुन्हा फुलवण्याचे काम मालवणच्या चारुशीला देऊलकर गेली वीस वर्षे करत आहेत. त्या कुटुंबांसाठी त्या अक्षरशः आधारवड बनल्या आहेत. 

व्यसनाधीनता, संशय, विवाहबाह्य संबंध अशा कितीतरी कारणांमुळे उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेले शेकडो संसार पुन्हा फुलवण्याचे काम मालवणच्या चारुशीला देऊलकर गेली वीस वर्षे करत आहेत. त्या कुटुंबांसाठी त्या अक्षरशः आधारवड बनल्या आहेत. 

अत्यंत साधी राहणी, सामाजिक कार्याचा वडिलांकडून मिळालेला वारसा आणि महिलांच्या उन्नतीसाठी आयुष्य झिजवणाऱ्या चारुशीला देऊलकर यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यांनी 20 वर्षांत अनेकांचे संसार पुन्हा फुलवले. शोषित महिलांचा त्या आधारवड बनल्या. चारुशीला या ज्येष्ठ मच्छीमार नेते ज्ञानेश देऊलकर यांच्या कन्या. वडिलांकडूनच समाजासाठी झटण्याचा वारसा त्यांना लाभला. त्यांनी मालवण हे कार्यक्षेत्र निवडले. मालवणातील नाथ पै सेवांगण हे विविध सामाजिक उपक्रमांचे केंद्र होय. येथेच त्यांनी कार्याला सुरवात केली. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाकडून स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध उपक्रम राबविले जातात.

याअंतर्गत डिसेंबर 1997 मध्ये देऊलकर यांनी नाथ पै सेवांगणमधील कुटुंब सल्ला केंद्राची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. या क्षेत्रात आल्यानंतर महिलांची अंतर्गत घुसमट किती गंभीर आहे, याची कल्पना त्यांना आली. त्यांनी त्यासाठीच झोकून देण्याचा निश्‍चय केला. 

मालवण परिसरात मच्छीमार महिलांची संख्या खूप आहे. त्यांचे प्रश्‍नही तितकेच संवेदनशील असतात; मात्र त्या फारशा व्यक्त होत नाहीत. चारुशीला यांनी अशा महिलांमध्ये विश्‍वास निर्माण केला. व्यसनाधीनता, छळवणूक, एकमेकांबद्दलचा संशय, विवाहबाह्य संबंध अशा कितीतरी कारणांनी अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतात. लज्जेपोटी काही महिला हे शोषण आयुष्यभर सोसतात.

काही महिला स्वतःहून या केंद्राकडे येतात; तर काहींना त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून द्यावी लागते. चारुशीला यांनी हे काम अगदी सर्वस्व ओतून पेलले. गेल्या 20 वर्षांत त्यांनी अनेकांचे संसार पुन्हा उभे केले. त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींपैकी संसार पुन्हा जोडण्याचे प्रमाण 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. या कार्याच्याच जोडीने महिला सक्षमीकरण, महिलांमध्ये कायदेविषयक जागृती, मच्छीमार महिलांच्या आरोग्याचे प्रश्‍न यासाठीही त्या कायम प्रयत्नशील असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites Positive news Charushila Deulkar