जवानाच्या प्रसंगावधानाने प्रवाशाला प्राणदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नागपूर - धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात वृद्ध प्रवासी फलाट व रेल्वेगाडीमधील फटीत ओढल्या गेला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने प्राण धोक्‍यात घालून प्रवाशाला सुखरूप बाहेर काढून प्राणदान दिले. हा थरारक घटनाक्रम मंगळवारी सायंकाळी नागपूर स्थानकावरील प्रवाशांनी अनुभवला.

नागपूर - धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात वृद्ध प्रवासी फलाट व रेल्वेगाडीमधील फटीत ओढल्या गेला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने प्राण धोक्‍यात घालून प्रवाशाला सुखरूप बाहेर काढून प्राणदान दिले. हा थरारक घटनाक्रम मंगळवारी सायंकाळी नागपूर स्थानकावरील प्रवाशांनी अनुभवला.

के. पाराशर (६४) असे प्राणदान मिळालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते दक्षिण एक्‍स्प्रेसने हैदराबादला जाणार होते. गाडीच्या प्रतीक्षेत ते फलाट क्र. २ वर उभे होते. दक्षिण एक्‍स्प्रेसच्या वेळेवर दाणापूर-सिकंदराबाद एक्‍स्प्रेस फलाटावर येऊन थांबली. गैरसमजुतीतून ते गाडीत जाऊन बसले. अन्य प्रवाशांशी चर्चेत चुकीच्या गाडीत बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे उतरण्यासाठी गेटवर आले. परंतु, तोवर गाडीने वेग धरला होता. लगबगीने गाडीतून उतरताना अंदाज चुकला आणि त्यांचे पाय रेल्वेगाडी आणि फलाटात असलेल्या फटीत अडकले. हा प्रसंग बघणाऱ्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला.

अनेकजण एकाचवेळी किंचाळले. यामुळे फलाटावरच अलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नागेश धनवटे यांचे लक्ष वेधले गेले. के. पाराशर जिवाच्या आकांताने फलाटाला धरून होते. त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न जिवावर बेतू शकतो याची जाणीव असतानाही धनवटे यांनी जीव धोक्‍यात घालून एका क्षणात पाराशर यांना बाहेर ओढले. या घटनेमुळे पाराशर यांच्यासह अन्य प्रवासीही घाबरले.

पाराशर यांच्या तोंडून बोलही फुटत नव्हते. नेमके त्याच वेळी विभागीय रेल्वेव्यवस्थापक ज्योतीकुमार सतिजा अन्य सहकाऱ्यांसह तिथे पोहोचले. त्यांनी पाराशर यांच्याशी चर्चा करून धीर दिला. त्यांना दक्षिण एक्‍स्प्रेसमध्ये बसवून पुढील प्रवासाला रवाना केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nagpur news passenger life saving by jawan