व्रतबंधाच्या मंडपात मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

परभणी - मुलाच्या व्रतबंधासाठी येणाऱ्या खर्चात बचत करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून येथील एकाने एक लाखाची मदत दिली. सचिन सुभाषराव दैठणकर असे या दात्याचे नाव असून त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम दिली. मंडपातच उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे तसे पत्र सुपूर्द केले.

सचिन दैठणकर यांचा मुलगा अर्जुन ऊर्फ सार्थ याचा बुधवारी (ता. २१) सकाळी साडेदहाला कल्याण मंडपममध्ये व्रतबंध संस्कार सोहळा झाला. लोकमान्य टिळक नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष असलेल्या दैठणकरांना सामाजिक कार्याची आवड आहे. मुलाच्या उपनयन संस्कारातून काहीतरी वेगळे करावे, असा विचार त्यांनी केला. आई अरुणा, पत्नी गौरी दैठणकर यांच्याशी चर्चा केली. विविध कारणांमुळे सध्या शेतकऱ्याची स्थिती दयनीय असून तो नैराश्‍याच्या गर्तेत सापडला आहे. निसर्गाची नसलेली साथ, शेतमालास न मिळणारा रास्त भाव आदींमुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबीत आहेत. शेतकऱ्यांनी धैर्य धरावे, आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग अवलंबून जीवन संपवू नये, अशी भूमिका दैठणकर यांनी मांडली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना काहीसा आधार म्हणून त्यांनी व्रतबंधाचा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाचलेली रक्कम ‘आरटीजीएस’द्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठवली. शासनाचे प्रतिनिधी पिनाटे यांना तसे पत्र या सोहळ्यातच प्रदान केले. आमदार डॉ. राहुल पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महापालिका सभापती गणेश देशमुख, ॲड. दीपक देशमुख, ॲड. किरण दैठणकर, नगरसेवक चंद्रकांत शिंदे, फौजदार श्री. मुपडे, रितेश जैन, श्री. मोताफळे, अरुणा दैठणकर, गौरी दैठणकर, रुद्र दैठणकर, गणेश शिंदे, शिवाजी गणपूरकर, कल्याण मोरे, प्रा. मारोतराव उमाटे, तलाठी राजू काजे आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parbhani news vrutbandh help