सोसूनही खूप काही तो लढतोय उपेक्षितांसाठी... 

Arun Jadhav
Arun Jadhav

जामखेड : स्वतः कोल्हाटी समाजात जन्मल्यानंतर उपेक्षेचे चटके सोसत उच्चविद्याविभूषित झाल्यानंतर समाजप्रती असलेले दायित्व व्यक्त करण्यासाठी आणि अन्य उपेक्षितांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासह समाजाच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्यसाठी त्याने पुढाकार घेतला. त्याच्या मदतीला हात पुढे येत गेले, त्याचे कार्य विस्तारत गेले. पिढ्यान्‌पिढ्या उपेक्षेचे चटके सोसलेल्यांच्या जीवनात त्याने जगण्याची केवळ उमेदच निर्माण केली नाही, तर त्याला वेगळी दिशा देऊन कर्तृत्वसंपन्न होण्यासाठी हातभारही लावला, ही कहाणी आहे येथील अरुण जाधव या कार्यकर्त्याची... 

वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून उपेक्षितांसाठी लढा उभारणाऱ्या जाधव यांच्या कार्याचा गौरव अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या 'महाराष्ट्र फाउंडेशन'ने पुण्यात केला. जाधव यांच्या कार्याला जामखेड येथील विविध संघटनांनीही गौरवले आहे. त्यांनी उच्चविद्याविभूषित झाल्यानंतर नोकरीच्या वाटा न शोधता, जन्मतःच उपेक्षितांच्या प्रश्नांची जाणीव असल्याने त्यांच्या उत्थानासाठी काम सुरू केले. रडणाऱ्यांचे डोळे पुसले. जगणे हरविलेल्यांमध्ये स्फुल्लिंग पेटविले.

एवढेच नाही, तर उपेक्षितांना न्याय मिळवून देताना कायद्याचा आधार घेण्यासाठी ते स्वतः कायद्याचे पदवीधरही झाले. पारधी, भिल्ल, मदारी आणि इतर उपेक्षितांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यातूनच सरकारच्या माध्यमातून पारधी आणि इतर आदिवासींसाठी लिंपणगाव (ता. श्रीगोंदा) येथे पंचावन्न जणांना निवारा मिळवून दिला. हक्काची पक्की घरे दिली. पारधी समाजातील दीडशे मुलांना पोलिस भरती प्रशिक्षणासाठी पाठविले, त्यामुळे त्यांना पोलिस दलात दाखल होण्याची संधी मिळाली. पन्नास नाचणाऱ्या कलाकार मुलींना सरकारच्या कलावंत मानधन योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यांच्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिला. 

खर्डा (ता. जामखेड) येथे मदारी विकास आराखडा हाती घेऊन वीस कुटुंबांसाठीच्या निवाऱ्याला मंजुरी मिळवली. पारधी विकास आराखड्याच्या माध्यमातून विशिष्ट रकमेची तरतूद करून त्यांच्या निवाऱ्याबरोबरच शिक्षण, व्यवसायासाठीचे नियोजन हाती घेतले. केवळ सरकारच्या सवलतींवर, योजनांवर अवलंबून न राहता जाधव यांनी उपेक्षितांमधील सुप्त गुण शोधले. बोलणाऱ्याला चांगला वक्ता बनविले. लिहिण्याची आवड असणाऱ्यांना लिहिते केले. पुस्तकरूपाने त्यांचा खडतर जीवनप्रवास जगासमोर पोचवला. एवढेच नाही, तर परिस्थितीमुळे शाळेची पायरी चढण्यास थरथरणाऱ्या पायांचा आधार बनून त्यांच्या मुलांसाठी जामखेड येथे चार वर्षांपासून स्वखर्चाने 'निवारा बालसुधारगृह' सुरू केले. 

'मला शिकायचंय' हे अभियान जाधव यांनी हाती घेतले आहे. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा या तीन तालुक्‍यांत त्यांचे काम सुरू आहे. दलित, भटक्‍या विमुक्त समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी जाधव यांनी झोकून देऊन काम केले. याकरिता आंदोलनाचा लढा पेटता ठेवला. निखारा बनून दबलेला आवाज फुलवला. त्यांच्या या खडतर प्रवासात त्यांची पत्नी, आई, बहीण, सहकारी, विविध संघटनांचे विशेष सहकार्य मिळाले. या लढ्याच्या उभारणीत समाजातील अनेक घटकांचे सहकार्य मिळाले, असे अरुण जाधव आवर्जून सांगतात. त्यांनी आपले जीवन सामाजिक चळवळीसाठी आणि समाजासाठी अर्पण करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

काही सुखद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com