संगीतातून आयुष्याचा सूर जुळविणारा 'म्युझिक कॅफे'  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Music Cafe at Pune

संगीतातून आयुष्याचा सूर जुळविणारा 'म्युझिक कॅफे' 

पुणे : 'रोज सकाळी ठराविक वेळी तुम्ही दिलेल्या सीडीवरचे ट्रॅक्‍स ऐकते. महिन्याभरानंतर हळूहळू फरक जाणवायला लागला आणि आता तर माझी बी.पी.ची गोळीसुद्धा बंद झाली...' 

'गेली अनेक वर्षे 'इश्‍यू'साठी प्रयत्न करत होतो; पण स्ट्रेसमुळे सक्‍सेस मिळत नव्हते. या 'म्युझिक ट्रॅक्‍स'ची मला 'कनसीव्ह' व्हायला खूप मदत झाली. आता मुलगी तीन महिन्यांची आहे आणि आता ती आणि मी दोघीही हे संगीत ऐकतो.' 

'पूर्वी मी खूप चिडून स्वतःला व इतरांना इजा केलेली आहे, आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण आता महिन्यापासून मोबाईलवर तुम्ही दिलेले ट्रॅक्‍स ऐकतोय. आतून खूप शांत वाटतंय. पहिल्यांदा तिथे येऊन संगीत ऐकलं तेव्हा पूर्ण वेळ रडत होतो. सगळी नकारात्मता बाहेर पडतीये असं वाटलं... आता मी खूप सत्कारात्मक आहे. 'आर्किटेक्‍चर'चे राहिलेले पेपर आत्ता मी देऊ शकलो.' 

हे आणि असे बरेच 'फीडबॅक' कुठल्या रुग्णालयातील नाहीत. हे आहेत एका 'कॅफे'संदर्भात... 'म्युझिक कॅफे'बाबत... पुण्यातल्या लॉ कॉलेज रोडवर संगीताच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारं एक आगळंवेगळं कॅफे. कॅफे म्हटल्यावर मेनूकार्ड तर हवंच. येथे तुम्हाला मिळेल कलावती कॉफी, दरबारी सरबत, आसावरी काढा, सारंग सरबत, मालकंस हर्बल चहा.

नेहमीच्या 'कॅफे'मध्ये पदार्थ महत्त्वाचे असतात, संगीत दुय्यम असतं. परंतु म्युझिक कॅफेमध्ये संगीत महत्त्वाचं आहे. कुठल्या प्रकारचं म्युझिक तुम्हाला ऐकायचं आहे. जसं की ताण घालवायचा, मधुमेहापासून मुक्तता हवी आहे. हृदय निरोगी राहण्यासाठी, रागावर नियंत्रण हवं आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढविण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळं संगीत उपलब्ध आहे. वीस मिनिटे, पंचेचाळीस मिनिटे, साठ मिनिटे असे वेगवेगळ्या कालावधीचे प्रकार उपलब्ध आहेत. 

युवकांची पसंती अधिक 
येथे येणारा सर्वाधिक वर्ग हा 18 ते 30 वयोगटातील आहे. उत्सुकता म्हणून या म्युझिक कॅफेत शिरणारा तरुण वर्ग संगीताच्या जादुई दुनियेत रंगून जातो अन्‌ परत येतो आपल्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत. अभ्यासात एकाग्रता होत नसेल, परीक्षेची काळजी वाटत असेल, काही कारणांमुळे नैराश्‍य आलं असेल, तर इथे आल्यावर या सर्व समस्यांवर मात करण्यास म्युझिक कॅफेची खूप मदत होते.

येथील म्युझिक रूममध्ये छोट्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. ज्यामध्ये संगीताच्या विविध पैलूंवर मान्यवरांसोबत संवाद साधला जातो; इतकंच नाही, तर इथे अनेक रसिक मित्र-मैत्रिणींचा किंवा नातेवाइकांचा सांगीतिक वाढदिवसदेखील साजरा होतो. 

सावनी व संतोष घाटपांडे आणि मृदुला व आनंद कोल्हारकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या म्युझिक कॅफेतर्फे रसिकांना सांगीतिक अनुभूतीबरोबरच प्रत्यक्ष कलाकारांकडून शास्त्रीय संगीतातील विविध पैलूंबद्दल, तसेच संगीतोपचाराबद्दल माहिती देण्यासाठी सांगीतिक मैफलींचे आयोजनही केले जाते. हजारोंच्या वर तरुणांना या म्युझिक कॅफेने जीवनाचा सूर सापडला आहे. 

मुलांसाठी कॅफे किड्‌स क्‍लब 
बालवयातच संगीताची गोडी लागावी म्हणून 'म्युझिक कॅफे किड्‌स क्‍लब' सुरू केला आहे. दर महिन्याच्या दोन रविवारी हा क्‍लब असतो. इथे मुलांना वेगवेगळी वाद्यं हाताळायला दिली जातात. त्यांना त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा, ते सांगितलं जातं. सांगीतिक खेळ घेतले जातात. त्यामुळे त्यांनासुद्धा छान गोडी लागते. कॅफेतर्फे लहान मुलांच्या शाळेत, विविध ज्येष्ठ नागरिक संघांत, कंपन्यांमध्ये चर्चासत्र- व्याख्यानं आयोजित केली जातात. संगीताचा वापर दैनंदिन आयुष्यात सहजपणे कसा करता येईल, कोणतं संगीत घरी ऐकलं पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. 

सकारात्मक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा