कोरेगावातील उद्योजिकांची गरुडभरारी प्रेरणादायी - वैशाली शिंदे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

सातारा - कोरेगाव शहरातील उद्योजिका महिलांनी आपापल्या छोट्या-मोठ्या उद्योगात घेतलेली गरूडभरारी इतर छोटी-मोठी गावे, शहरांतील महिलांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास सार्थक फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली शिंदे यांनी व्यक्त केला. 

सातारा - कोरेगाव शहरातील उद्योजिका महिलांनी आपापल्या छोट्या-मोठ्या उद्योगात घेतलेली गरूडभरारी इतर छोटी-मोठी गावे, शहरांतील महिलांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास सार्थक फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली शिंदे यांनी व्यक्त केला. 

कोरेगाव येथील जागृती महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे बाजारपेठ मैदानावर आयोजित ‘जागृती उद्योजिका पुरस्कार २०१८’ चे वितरण, महिला-युवतींसाठी फनी गेम्स आणि स्नेहभोजन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून वैशाली शिंदे बोलत होत्या. कोरेगावच्या तहसीलदार स्मिता पवार, कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पूनम कदम, जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना शिंदे, कोरेगावच्या माजी उपसरपंच प्रतिभा बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी हेमलता भंडारी, मनीषा मुळीक, श्रध्दा निकम, पल्लवी महामुनी, प्रतीमा ओसवाल, विद्या चव्हाण, ससिया मणेर यांना उद्योजिका पुरस्कार देवून गौरवण्यात आले. जागृती उद्योजिका पुरस्कारप्राप्त महिलांनी आपले स्वतःचे कुटुंब, संसार नीटनेटका करून प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि खडतर अशा परिश्रमाच्या शिदोरीवर आपापले उद्योग यशस्वी केल्याचे पाहून सर्वांचा हेवा वाटतो.

त्यांच्यामध्ये असलेली प्रबळ इच्छाशक्ती जर प्रत्येक महिलेने अंगिकारली तर कोणतीही महिला उद्योगधंद्यात यशस्वी झाल्यावाचून राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करून वैशाली शिंदे यांनी जागृती मंडळाने अशा यशस्वी उद्योजिकता हेरून त्यांचा गौरव केल्याबद्दल मंडळाच्या अध्यक्षा वंदना शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकारी मैत्रिणींचे कौतुक केले. तहसीलदार पवार, मुख्याधिकारी कदम, माजी उपसरपंच बर्गे यांनीही मंडळाच्या कार्याचे कौतुक करून पुरस्कारप्राप्त महिला उद्योजिकांचे अभिनंदन केले. 

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनीही पुरस्कार वितरण समारंभास भेट देवून मंडळाच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या अध्यक्षा शिंदे यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा सादर करून स्वागत केले. पुरस्कार वितरण समारंभानंतर झालेल्या फनी गेम्सला महिला, युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर स्नेहभोजन समारंभ झाला. 

या वेळी पल्लवी शिंदे, साधना बर्गे, डॉ. संगीता सावंत, तारका बर्गे, नीना खत्री, माधुरी मालुसरे, अपर्णा चिनके, देवकी सावंत, रेखा बर्गे, राजश्री पाटील, सुनीता येवले, संजीवनी मोरे, सुवर्णा शिंदे, आशा बर्गे, सुवर्णा फडतरे, सुरेखा घनवट, अनिता सावंत, विद्या चव्हाण, सीमा जाधव, अलका कणसे, शामल शिंदे, उमा शिरतोडे आदी मंडळाच्या सदस्यांसह महिला, युवती उपस्थित होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news satara news businessman women success