स्वित्झर्लंडच्या मॅरेथॉनमध्ये ओमकारचे नेत्रदीपक यश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

साकोळ - दहावीमध्ये नापास झाल्यानंतरही या अपयशाला झुगारून साकोळचा धावपटू ओमकार स्वामीने इतिहास रचत स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे.

साकोळ - दहावीमध्ये नापास झाल्यानंतरही या अपयशाला झुगारून साकोळचा धावपटू ओमकार स्वामीने इतिहास रचत स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे.

स्वित्झर्लंड येथील झर्मत या शहरांमध्ये तीन जुलैरोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेत ओमकारने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ओमकारची निवड करण्यात आली होती. १०० कि.मी. धावण्याचे अंतर ओमकारने नऊ तास दोन मिनिटांत पूर्ण केले. या स्पर्धेत केनियाच्या विल्सन किपसंग या धावपटूने हे अंतर आठ तास १० मिनिटांमध्ये पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले, तर दुसराही क्रमांक केनियाच्याच डेनिस किमटो या धावपटूने आठ तास ४० मिनिटांत पूर्ण करीत रजत पदक मिळविले. ओमकारने कांस्यपदक पटकावत भारताची मान परदेशातही उंचावली आहे.

ओमकारने स्पर्धेला जाण्यापूर्वीच या स्पर्धेत यश मिळवणारच असा विश्वास व्यक्त केला होता. त्याने आपला शब्द राखत यश मिळवण्याचे स्वप्न साकारले आहे. ओमकारने धावण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण पंजाबमधील पटियाला येथील सुभाष नॅशनल ॲकॅडमी येथे घेतले आहे. ओमकारने यापूर्वीही भारतातील स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके मिळविली आहेत. त्यात औरंगाबाद येथे झालेल्या २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले होते, २०१७ मध्ये चेन्नई येथे झालेल्या चेन्नई चॅंपियनशिप मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक प्राप्त केला होता. त्यामुळे त्याला चेन्नई स्पोर्ट असोशियशनतर्फे बेस्ट रनर पुरस्कार मिळाला होता. सिमला येथे झालेल्या २१ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता, तर मुंबई येथे झालेल्या टाटा मॅरेथॉनमध्ये पहिल्या दहामध्ये तो आला होता. त्याने मिळवलेल्या कांस्यपदकामुळे स्पर्धेच्या आयोजकाकडून ओमकारचा ‘स्टार ऑफ स्विस’ हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. ओमकारने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathon competition medal omkar swamy success motivation