वालसावंगीत शेतकरी बनताहेत उद्योजक

विशाल अस्वार
रविवार, 3 सप्टेंबर 2017

वालसावंगी, ता. २ : विविध शासकीय योजनांचा आधार घेत येथील उद्यमशील शेतकरी, युवकांची आता उद्योजकतेकडे वेगाने वाटचाल सुरू झाली आहे. 

वालसावंगी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची १ जानेवारी २०१५ रोजी स्थापना केल्यानंतर आता यशस्वी घोडदौड सुरू झाली आहे. गावातील जवळपास १२ शेतकरी बचतगट, एक महिला शेतकरी बचतगट मिळून २६४ शेतकरी कंपनीचे सदस्य आहेत. कंपनीचे गोदाम, धान्यावर प्रक्रियेची यंत्रणा, बीज उत्पादन, धान्याची थेट व्यापाऱ्यांना विक्री आदी माध्यमातून उलाढालीचा आलेख वाढतच आहे. 

वालसावंगी, ता. २ : विविध शासकीय योजनांचा आधार घेत येथील उद्यमशील शेतकरी, युवकांची आता उद्योजकतेकडे वेगाने वाटचाल सुरू झाली आहे. 

वालसावंगी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची १ जानेवारी २०१५ रोजी स्थापना केल्यानंतर आता यशस्वी घोडदौड सुरू झाली आहे. गावातील जवळपास १२ शेतकरी बचतगट, एक महिला शेतकरी बचतगट मिळून २६४ शेतकरी कंपनीचे सदस्य आहेत. कंपनीचे गोदाम, धान्यावर प्रक्रियेची यंत्रणा, बीज उत्पादन, धान्याची थेट व्यापाऱ्यांना विक्री आदी माध्यमातून उलाढालीचा आलेख वाढतच आहे. 

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, कृषी व पणन विभाग, जागतिक बॅंक आदींच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी ही कंपनी स्थापन केली. गोदाम तसेच मशिनरीसाठी त्यांना १३ लाख रुपये कृषी विभागातून अनुदानदेखील मिळाले. कंपनीच्या सदस्यांनी लोकसहभागातून वर्गणी करून कंपनीसाठी १० गुंठे जागा घेतली. जागेला तार कंपाउंड केले, बोअर घेतला, वृक्षारोपण करून परिसर हिरवाईने नटविला आहे.  

प्रारंभी धान्यांची प्रतवारी व स्वच्छता करणारी मशिनरी कंपनीने विकत आली. या ठिकाणी मका, सोयाबीन पिकांवर प्रक्रिया करायची व ठोक व्यापाऱ्यांना तो माल विक्री केला. पुढे अगदी माफक दरात त्यांनी गव्हाची स्वच्छता करण्यास सुरवात केली. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धान्य स्वच्छतेसाठी आणत कंपनीला चांगला प्रतिसाद दिला. 

शेतकऱ्यांना मार्गदर्शनही 
मका-सोयाबीन पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत जवळपास १०० शेतकऱ्यांना कंपनीमार्फत मोफत खते, औषधीचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे. या कंपनीचे गावात स्वतंत्र कार्यालय असून या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत सल्लादेखील देण्यात येतो.

खते-औषधी विक्रीचा  मार्ग मोकळा
कंपनीत काम करणाऱ्या युवकांचा उत्साह व जिद्द बघून कृषी विभागाने त्यांना खते व औषधी विक्रीचा परवाना दिला. त्याचप्रमाणे पणन विभागानेदेखील महाराष्ट्र राज्यात बी-बियाणे, खते, औषधी, खरेदी व विक्री करण्याचा परवानादेखील या कंपनीला दिला आहे.

कंपनीचे बियाणे  लवकरच बाजारात 
या कंपनीने अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत हरभरा बीज उत्पादन कार्यक्रम राबविला. याची पाहणी जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, आळसे, दिवटे, प्रकल्प संचालक श्री. भोसले तसेच त्यांच्या पथकाने भेट देऊन केली होती. पुढे हरभरा बियाणांची स्वच्छता करून त्यावर प्रक्रिया करणे सुरू आहे. जवळपास ६०० क्विंटल हरभरा बियाणे निर्मिती झाली. २० किलो प्रतिबॅग याप्रमाणे ३ हजार बॅग कंपनीच्या लोगोसह राज्यभर बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

युवकांना रोजगार 
या कंपनीवर १२ सदस्य असलेल्या समितीचे नियंत्रण आहे. कंपनीची कामे, मार्केटिंग, हरभरा पॅकिंग, धान्य प्रतवारी यासाठी कंपनीचे सदस्य असलेल्या अनेक युवकांना रोजगार मिळाला आहे. बेरोजगार असतानासुद्धा युवकांनी उभारलेली ही ॲग्रो प्रोड्युसर कंपनी इतर युवकांकरिता प्रेरणादायी ठरत आहे. 

ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकरी हित जोपासण्याचे काम करण्यात येत आहे. या ठिकाणी विद्युत रोहित्र नसल्याने थोडी अडचण होत आहे. त्याचप्रमाणे आर्थिक चणचण भासत असल्याने काही करण्यास वेळ लागत आहे. मात्र हरभरा बियाणे विक्रीतून नफा राहिल्यास अजून प्रयोग करण्यात येतील.
- श्रीकांत आखाडे,  अध्यक्ष, वालसावंगी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी

 धान्याची प्रतवारी, स्वच्छतेपासून प्रारंभ
 मका व सोयाबीनवर प्रक्रियेची सोय
 हरभरा बीज उत्पादन जोरात
 स्वच्छ धान्यांची व्यापाऱ्यांना विक्री 
 बियाणे, खते विक्रीचाही मिळाला परवाना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathwada news farmer businessman