महिला शेतकऱ्याच्या जिद्दीने निर्माण केला आदर्श

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नळेगाव - लिंबाळवाडी (ता. चाकूर) येथील मंगलबाई व्यंकट पाटील यांनी संसाराचा गाडा ओढत, जिद्द व मेहनतीच्या जोरावर शेतीत नवनवीन प्रयोग करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

नळेगाव - लिंबाळवाडी (ता. चाकूर) येथील मंगलबाई व्यंकट पाटील यांनी संसाराचा गाडा ओढत, जिद्द व मेहनतीच्या जोरावर शेतीत नवनवीन प्रयोग करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

चाकूर तालुक्‍यातील लिंबाळवाडी हे १५० उंबऱ्यांचे गाव आहे. शिवारातील जमीन मध्यम व हलक्‍या प्रतीची असून कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नाहीत. येथील महिला शेतकरी मंगलबाई व्यंकट पाटील यांच्याकडे वडिलोपार्जित १८ एकर शेती आहे. २७ वर्षांपूर्वी पतीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या वेळी बळवंत (वय तीन वर्षे) व सतीश (वय तीन महिने) मुले होती. पतीच्या निधनाने दु:खाचा डोंगर कोसळला होता. शेतीतील कुठलीच माहिती नव्हती; पण शेती केल्याशिवाय दुसरा पर्याय समोर दिसत नव्हता. वडील माणिक बोळेगावे (रा. चामरगा) यांच्या मदतीने सर्व दु:ख बाजूला सारून मनाशी जिद्द बाळगून शेती करण्याचा त्यांनी निश्‍चय केला. या सर्व व्यापात मुलाच्या शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. आज दोन्हीही मुलं आईसोबत शेती करतात. मुलांच्या सहाय्याने त्यांनी शेतात अनेक प्रयोग केले आहेत. 

पारंपरिक शेतीला फाटा देत भाजीपाला शेती करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी शेतीत गेल्या काही वर्षांत वेगवेगळे प्रयोग केले व त्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या उत्पन्नातही चांगली वाढ झाली. आज त्यांच्या शेतीत दीड एकर हळद, दोन एकर अद्रक, १० एकर ऊस आहे. दोडका, कारले, मिरची आदी पिके घेतली आहेत. पाण्यासाठी यांच्याकडे दोन विहिरी, दोन विंधन विहिरी, चार किलोमीटर अंतराची घरणी प्रकल्पावरून पाईप लाइनच्या सहाय्याने संपूर्ण शेती ओलिताखाली आणली आहे.

पतीच्या निधनाने दु:खाचा डोंगर समोर उभा होता. वडिलांच्या आधाराने शेती करण्याचा निश्‍चय केला. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते; पण उपजीविका भागत होती. मुलाच्या सहाय्याने शेती करीत नवनवीन पिकांची लागवड करून शेतीत प्रगती साधता आली.
-मंगलबाई व्यंकट पाटील, महिला शेतकरी, लिंबाळवाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathwada news women Farmer chakur