विद्यार्थिनींनी बनवल्या सैनिकांना राख्या

संजय जगताप
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मायणी - रात्रंदिवस सीमेवर खडा पहारा देत देशवासीयांची सुरक्षा करणाऱ्या जिगरबाज सैनिकांसह, समाजाने नाकारलेल्या, एकाकी, निष्पाप अनाथ मुलांनाही बहिणीची माया मिळावी, यासाठी येथील वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतर्फे त्यांना राख्यांचा प्यारा तोहफा देवून येथील सामाजिक बांधिलकीची जपणूक केली जात आहे. मुलींनी स्वतः बनविलेल्या एक हजार २०० राख्या प्रशालेमार्फत ठिकठिकाणी रवाना करण्यात आल्या. 

मायणी - रात्रंदिवस सीमेवर खडा पहारा देत देशवासीयांची सुरक्षा करणाऱ्या जिगरबाज सैनिकांसह, समाजाने नाकारलेल्या, एकाकी, निष्पाप अनाथ मुलांनाही बहिणीची माया मिळावी, यासाठी येथील वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतर्फे त्यांना राख्यांचा प्यारा तोहफा देवून येथील सामाजिक बांधिलकीची जपणूक केली जात आहे. मुलींनी स्वतः बनविलेल्या एक हजार २०० राख्या प्रशालेमार्फत ठिकठिकाणी रवाना करण्यात आल्या. 

मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील गुदगे कन्या प्रशालेत सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. गेली पाच वर्षे प्रशालेतर्फे सीमेवरील जवान, बालसुधार गृहातील मुले व अनाथाश्रमातील मुलांना राख्या पाठवण्यात येत आहेत. शिक्षक चंद्रकांत पवार यांच्या कल्पनेतून सुरू झालेला रक्षाबंधनाचा हा अनोखा उपक्रम सुरू झाला. त्यांची बदली झाली. तरीही त्यांचे सहकार्य घेत शिक्षिका ज्योती कुंभार यांनी हा उपक्रम पुढे चालू ठेवला आहे. इयत्ता पाचवी ते दहावीतील मुलींच्या सहकार्याने प्रशालेतच राख्या बनविण्यात आल्या. त्यासाठी सर्व शिक्षक सहकाऱ्यांची मदत घेण्यात आली. विद्यार्थिनींच्या अंगभूत कलागुणांना वाव देत नवनिर्मितीची संधी प्राप्त करून देण्यात आली. राख्या तयार करण्यासाठी आवश्‍यक साहित्य, साधनांची उपलब्धता करून दिली.

कार्यानुभव विषयांतर्गत सर्व वर्गातील मुलींकडून राख्या बनवून घेण्यात आल्या. आकर्षक राख्यांची वेगवेगळी पाकिटे तयार करण्यात आली. विद्यार्थिनी प्रतिनिधीमार्फत मुख्याध्यापिका वृषाली पाटील यांच्याकडे ती सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर ती पाकिटे प्रशालेच्या माध्यमातून पोस्टाद्वारे नियोजित ठिकाणी पाठवण्यात आली. 

सर्वाधिक राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. साताऱ्यातील बालसुधारगृह, कऱ्हाडमधील क्रांतिवीर माधवराव जाधव बालसुधारगृह, म्हसवड, विटा ( जि. सांगली) येथील आश्रमशाळांनाही राख्या पाठवण्यात आल्या. डेहराडून, जम्मू-काश्‍मीर, दिल्ली व आसाम या ठिकाणच्या बालसुधारगृहे व अनाथ आश्रमांतील मुलांसाठीही राख्या रवाना करण्यात आल्या. शाळकरी मुलींच्या या संवेदनशील व सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर, संचालक, तनिष्का गटप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे, सरपंच (प्रभारी) प्रकाश कणसे, मुख्याध्यापिका वृषाली पाटील, पर्यवेक्षक बाळकृष्ण इनामदार आदींनी केले आहे.

राख्या मिळाल्यानंतर सैनिकांकडून जे संदेश येतात, त्यामुळे आम्ही भारावून जातो. वेगळे काही तरी केल्याचे व कृतार्थ झाल्याचे समाधान वाटते.
- वृषाली पाटील, मुख्याध्यापिका, गुदगे कन्या प्रशाला, मायणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayani news girl student rakhi making for jawan