...अखेर आईच्या कुशीत विसावला मयूर

महादेव पवार
गुरुवार, 28 मार्च 2019

आई-वडिलांनी आपले मतभेद बाजूला ठेवून पाल्यांचे संगोपन केले पाहिजे. सध्या मुलांना पळवून नेण्याचे प्रकार घडत आहेत. मयूर रात्री दहा वाजता चांदणी चौकात रडत बसला होता. त्याच्यासोबत काही वेगळा प्रकार घडला असता, तर याला जबाबदार कोण? त्यामुळे लहान मुलांची पालकांनी जबाबदारी  घेणे गरजेचे आहे.
- प्रकाश खांडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वारजे पोलिस ठाणे

वारजे - आईच्या प्रेमासाठी व तिला भेटण्यासाठी सायकलवरून निगडीला निघालेल्या अवघ्या दहा वर्षांच्या मयूरला पोलिसांनी मदतीचा हात दिला आणि तो सुखरूप आईच्या कुशीत विसावला.

मागील दोन वर्षांपासून मयूर लांडगेचे आई-वडील कौटुंबिक वादामुळे वेगळे राहतात. मयूर हा वडिलांसोबत धायरीत राहतो, तर आई माहेरी निगडीत राहते.
दोन वर्षांपासून आईची भेट झाली नसल्याने तिला भेटायला तो सायकलवरून निघाला. धायरी, वडगाव, वारजे करत तो महामार्गाच्या रस्त्याने चांदणी चौक येथे पोहोचला. मात्र, रात्र झाल्याने त्याला पुढे रस्ता समजण्यास अडचणी आल्या, त्यामुळे चांदणी चौक येथे तो रडत बसला. त्याला त्याच्या आईचा पत्तादेखील पूर्ण माहिती नव्हता. वारजे पोलिस स्टेशनचे बीट मार्शल अजय कामथे व नितीन कातुर्डे हे दोघे येथे गस्त घालत असताना, मयूर त्यांच्या निर्दशनास आला. पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनानुसार महिला कर्मचारी अर्चना पारखे, वैशाली मेमाणे, ज्योती थोरात यांनी त्याच्याशी संवाद साधून घडलेल्या प्रकार जाणून घेतला. आईच्या कुशीत विसावण्यासाठी मयूरने केलेली धडपड पाहून पोलिसांचे डोळेदेखील पाणावले. वारजे पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांची समजूत काढली. मुलाच्या प्रेमाखातर त्याला आईकडे सोपवण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayur Landage Mother Police Humanity