दुष्काळी मिडगुलवाडी पर्यटनाकडे

युनूस तांबोळी 
बुधवार, 10 जुलै 2019

मिडगुलवाडी हे शिरूर तालुक्‍यातील सर्वांत उंच ठिकाण. डोंगर, दरी, नागमोडी वळणांचा घाट आणि वन्यप्राण्यांसाठी लपण्याचे ठिकाण. पण, या परिसराला नेहमीच दुष्काळाला सामोरे जावे लागते. ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे झाडांची लागवड व डोंगरावर पडणारा पाऊस तलावाकडे वळविल्याने मिडगुलवाडी परिसर हिरवागार होऊन पर्यटकांना आकर्षित करणारा ठरत आहे.

टाकळी हाजी - मिडगुलवाडी हे शिरूर तालुक्‍यातील सर्वांत उंच ठिकाण. डोंगर, दरी, नागमोडी वळणांचा घाट आणि वन्यप्राण्यांसाठी लपण्याचे ठिकाण. पण, या परिसराला नेहमीच दुष्काळाला सामोरे जावे लागते. ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे झाडांची लागवड व डोंगरावर पडणारा पाऊस तलावाकडे वळविल्याने मिडगुलवाडी परिसर हिरवागार होऊन पर्यटकांना आकर्षित करणारा ठरत आहे. यासाठी पर्यटन विभागाचे सहकार्य गरजेचे आहे.

मिडगुलवाडी येथे नोव्हेंबरपासून टॅंकरची उपलब्धता करून देण्यात येते. दुष्काळी भाग असल्याने या भागातील तरुण नोकरीसाठी शहराकडे वळले आहेत. या वर्षी देखील कमी पावसामुळे येथे पाणीटंचाई निर्माण झाली होती. घरासमोर प्लॅस्टिकच्या टाक्‍या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. दुष्काळी भाग म्हणून लग्न जमण्यासही अडचणी येत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करतात. गेल्या काही वर्षांपासून येथे डोंगरच्या कडेने झाडांची लागवड करण्यात आली होती. उन्हाळ्यात त्याचे संवर्धन करण्यात आले. या वर्षी मात्र या डोंगराच्या कडेने मोठा चर खोदण्यात आला होता. डोंगर परिसरातील पडणारे पावसाचे पाणी जवळच असणाऱ्या तलावाकडे वळविण्यात आले. पूर्वमोसमी पावसाच्या सरी काही प्रमाणात या भागात पडल्या. डोंगरावर पडणारे पाणी या तलावात साठले गेले आहे. झाडांना देखील नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाच्या सरी कोसळल्याने हा परिसर हिरवागार दिसू लागला आहे. या परिसराला भविष्यात पर्यटनस्थळ करण्याचा मानस असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Midgulwadi Tourism