वर्गमित्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

योग्यवेळी मिळाली मदत 
अल्पभूधारक शेतकरी श्रीरंग कळम यांनी ठिबक सिंचन, रावसाहेब कळम यांनी बी-बियाणे, शेतीच्या मशागतीसाठी, तर सुभाष रोठे यांनी विहीर बांधकामासाठी अल्प व्याजदराने मिळालेल्या कर्जामुळे दुष्काळात वर्गमित्रांचा आर्थिक मदतीचा हात मोलाचा ठरला असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.

सिल्लोड - दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी सातत्याने तोंड देत असताना वर्गमित्र शेतकऱ्यांची पैशांसाठी होणारी दमछाक टाळण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत वर्गमित्रांनी एकत्र येत बचत गट तयार केला. या बचत गटाच्या माध्यमातून शेती व्यवसाय करीत असलेल्या शेतकरी वर्गमित्रांना अल्प व्याजदराने वित्त पुरवठा केला जात आहे. हा आगळावेगळा उपक्रम भवन (ता. सिल्लोड) येथिल वर्गमित्रांनी सुरू केला आहे.

सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये १९९५ मध्ये दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी अठरा महिन्यांपूर्वी या विधायक उपक्रमाची सुरवात केली. तेवीस वर्गमित्रांनी गेट टू गेदरचा उपक्रम हाती घेत युवा परिवर्तन बचत गटाची स्थापना केली. नोकरी, व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेल्या २३ वर्गमित्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेला बचत गट आता वर्गमित्र शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरत आहे. गटातील तीन वर्गमित्रांना अल्प व्याजदराने एक वर्षाच्या मुदतीचे प्रत्येकी वीस हजार रुपये कर्ज देऊन देण्यात आले आहे. अडचणीच्या वेळी मित्रांना मिळालेली मदत मोलाची ठरली आहे. शेतकरी वर्गमित्राच्या  मुलीच्या लग्नासही दोन वर्षांपूर्वी आर्थिक मदत केली होती. बचत गटातील दहा सदस्य वगळता उर्वरित तेरा सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावले आहेत. बाहेर असतानाही बचत गटाची दरमहा बचत दहा तारखेच्या आत गटाच्या भवन येथील बॅंक ऑफ बडोदाच्या खात्यावर ऑनलाइन जमा करण्यात येते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या वर्गमित्रांमध्ये नगर येथे व्यावसायिक असलेले नीलेश गिरमे, औरंगाबाद येथील शिक्षक विजय सोनवणे, व्हेरॉक कंपनीचे व्यवस्थापक नंदकिशोर शिंदे, इंटेरिअर डिझायनर स्वप्नील राजपूत, सिल्लोड येथिल अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश मिरकर, संतोष बोराडे, दिनेश राऊत, विजय लांडगे, यादवराव कळम, रावसाहेब कळम, अशोक पांडे, शंकर तुपे, शिवाजी शिंदे, सुभाष रोठे, योगेश्वर सोनवणे, संतोष जंगले, दत्तात्रय सोनवणे, सचिन बाविस्कर, संजय कोलते, राजू कोलते, सुनील कपाळे, सुनील थोरात, श्रीरंग कळम, लक्ष्मण बकले यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Motivation Class Friend Farmer Economic Help