खो-खो खेळाडू बनली फौजदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

खो-खो खेळाची आवड संदीप चव्हाण सरांमुळे निर्माण झाली. इयत्ता सातवीत असताना सर्वोत्कृष्ट खो-खो खेळाडू हा मिळालेला बहुमान मला आजही आठवतो. विविध ठिकाणी जाऊन स्पर्धेत सहभागी होता आले. खऱ्या अर्थाने मैदानावरच्या लाल मातीने मला कणखर बनविले.
- पल्लवी वाघ

निरगुडसर - रांजणी (ता. आंबेगाव) येथील नरसिंह क्रीडा मंडळातील खो-खो खेळाडू पल्लवी गोविंद वाघ हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. रांजणी गावातून पहिली महिला पोलिस अधिकारी होण्याचा बहुमान तिने मिळविला आहे. 

पल्लवीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी येथे झाले, तर माध्यमिक शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालय रांजणी येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे पूर्ण करून बीकॉमची पदवी महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावून मिळविली. नंतर तिने स्पर्धा परीक्षेचा सराव करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २२५ गुण मिळवून खुल्या गटात चौदाव्या क्रमांकासह फौजदार होण्याचा मान मिळविला.

खो-खो या खेळाचा उपयोग तिला शारीरिक क्षमता चाचणीमध्ये झाला. यात तिला १०० पैकी ९८ गुण मिळाले. या यशामध्ये सर्वांत मोठे योगदान हे माझ्या आई वडिलांचे असून, शेतकरी कुटुंब, तुटपुंजी शेती, उपजीविकेसाठी सांभाळलेल्या गाई, आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही वडिलांनी शिक्षणासाठी कधीही मुलगी म्हणून बंधने घातली नाही. 

प्राथमिक शाळेत लाभलेल्या विद्या वाघ मॅडम, नरसिंह विद्यालयात लाभलेले संदीप चव्हाण सर, दत्ता येवले सर, यादव सर यांच्यामुळे शिक्षणाचा भक्कम पाया घडल्याचे पल्लवीने सांगितले. सर्व सहकारी खेळाडूंनी व प्रशिक्षक संदीप चव्हाण यांनी पेढा भरवून तिचे अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC Kho-Kho player PSI