किडनीदान करून सासूने वाचविले जावयाचे प्राण

बापूसाहेब वाघ
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुखेड - शरीराचा एखादा आवश्‍यक अवयव निकामी झाला, तर त्या व्यक्तीला त्याचे मोल किती अनमोल आहे याची जाणीव होते. प्रसंगी आयुष्यच उद्‌ध्वस्त होण्याची वेळ येते. परंतु एखाद्या व्यक्तीने अवयवदानातून गरजू रुग्णाच्या जीवनातील अंधार दूर केल्यास अवयवदानाची जीवनात किती गरज आहे, याचीही प्रचीती येते.

जळगाव नेऊर (ता. येवला) येथील शिंदे कुटुंबातील पुष्पाबाई शिंदे यांनी महिनाभरापूर्वी मुलीच्या सुखी संसारासाठी जावयास आपली किडनी दान केली. जळगाव नेऊर येथील सुदाम शिंदे यांची मुलगी कविता हिचा पिंपळगाव लेप (ता. येवला) येथील नानासाहेब झाल्टे यांच्याशी विवाह झाला. ‘नांदा सौख्य भरे’ लग्नानंतर या सुखी परिवारावर नजर लागावी असा प्रसंग ओढवला. कविताचे पती नानासाहेब झाल्टे यांच्या आजारपणात दोन्ही किडन्या निकामी झाल्या.

किडनी दानच यावर शेवटचा पर्याय शिल्लक राहिला. मुलीच्या संसाराचा गाडा सुरळीत चालावा, यासाठी पुष्पाबाई शिंदे यांनी जावयाला किडनी दान देण्यासाठी सरसावल्या. एक वर्षापासून याबाबत प्रयत्न सुरू असताना २० डिसेंबर २०१७ मध्ये मुंबई येथील सायन रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. २०१२ मध्ये जळगाव नेऊर येथील रुख्मिणी कुऱ्हाडे यांनी मुलगी सविता केदार (धुळे) हिस किडनी दान केली होती.

पैठणी विक्रेत्यांकडून विशेष गौरव
जळगाव नेऊर येथील पुष्पाबाई शिंदे व रुक्मिणी कुऱ्हाडे यांनी मुलीच्या सुखी परिवारासाठी किडनी दान करून समाजात आदर्श निर्माण केला. या अवयवदान केलेल्या मातांचा गौरव सोहळा जळगाव नेऊर येथील संस्कृती पैठणी, सौभाग्य पैठणी, कला संस्कृती पैठणी व कलादालन पैठणी यांच्यातर्फे लवकरच करण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukhed news kidney donate life saving