esakal | एका फोनवर मिळते निराधारांना ऊब
sakal

बोलून बातमी शोधा

एका फोनवर मिळते निराधारांना ऊब

कोल्हापूर - आपल्याला कोणीही थंडीने गारठलेले किंवा कुडकुडत रस्त्याकडेला झोपलेले दिसले, तर लगेच आम्हाला फोन करून पत्ता, ठिकाण कळवा. तातडीने स्वेटर, ब्लॅंकेट पोहोच केले जाईल. व्हॉटस्‌ ॲपवर फिरणाऱ्या या मेसेजने ६४ निराधारांना ऊब दिली आहे. मुक्ता फाऊंडेशनच्या वतीने हा मेसेज फॉर्वर्ड केला जात आहे.

एका फोनवर मिळते निराधारांना ऊब

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - आपल्याला कोणीही थंडीने गारठलेले किंवा कुडकुडत रस्त्याकडेला झोपलेले दिसले, तर लगेच आम्हाला फोन करून पत्ता, ठिकाण कळवा. तातडीने स्वेटर, ब्लॅंकेट पोहोच केले जाईल. व्हॉटस्‌ ॲपवर फिरणाऱ्या या मेसेजने ६४ निराधारांना ऊब दिली आहे. मुक्ता फाऊंडेशनच्या वतीने हा मेसेज फॉर्वर्ड केला जात आहे.

शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात पीएच.डी. करणारे विशाल मोरे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हर्षदा परीट आणि प्रा. अनिल महापुरे व प्रा. विद्या आरे यांनी वेगळ्या वाटेने जात हा उपक्रम प्रत्यक्षात आणला. रस्त्याकडेला, बसस्थानक परिसरात अनेक निराधार ऊन, वारा, पाऊस सोसत थंडीने कुडकुडत असल्याचे आपल्या आजूबाजूला रोज दिसते.

या निराधारांना स्वेटर आणि ब्लॅंकेट देण्याचा त्यांनी निश्‍चय केला. मध्यवर्ती बसस्थानक, सीपीआर, महापालिका परिसर, भवानी मंडप परिसरातील अनेक निराधारांना त्यांनी स्वखर्चातून स्वेटर आणि ब्लॅंकेट दिले, मात्र आणखी कोठे असे जीवन जगणारे निराधार आहेत, याची माहिती त्यांना पाहिजे होती. यासाठी त्यांनी सोशल मीडियातील सर्वांत सोपा पर्याय म्हणून ‘व्हॉटस्‌ ॲप’चा आधार घेतला. 

एसएमएस तयार करून तो सर्व ग्रुपवर फॉर्वर्ड केला. बघता बघता त्यांना फोन येऊ लागले आणि त्यांनी स्वेटर ब्लॅंकेट वाटण्यास सुरवात केली. कऱ्हाड, इचलकरंजी, राधानगरीतून फोन आले. तेथेही जाऊन निराधारांना स्वेटर आणि ब्लॅंकेट दिले. इचलकरंजीतील अजिंक्‍य पाटील यांनी मुक्ता फाऊंडेशनचा आदर्श घेऊन स्वखर्चाने हा उपक्रम सुरू केला आहे.

कडाक्‍याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या ६४ निराधारांना मायेची ऊब मिळाली. व्हॉटस्‌ ॲपवरून शेअर झालेल्या एका एसएमएस हे शक्‍य झाले आहे. शिवाजी विद्यापाठीतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच पथदर्शी आहे. असेच उपक्रम सर्वत्र झाले तर एकही निराधार थंडीने कुडकुडणार नाही.

मुंबईहून फोन..
व्हॉटस्‌ ॲपवरून फिरणारा मेसेज मुंबईपर्यंत पोहोचला आहे. मुंबईहून एका व्यक्तीने फोन करून उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. या उपक्रमासाठी हवी ती मदत देण्याचीही तयारी दाखवली आहे. आत्तापर्यंत दोन-तीन व्यक्तींनी उपक्रमासाठी मदत केली आहे. यातून ब्लॅंकेट खरेदी केल्याचे विशाल मोरे यांनी ‘सकाळ’शी बोलता सांगितले.

loading image