वंचित मुलांसाठी "शिक्षण, आरोग्य आणि संस्कार'

सूर्यकांत नेटके
शनिवार, 20 जानेवारी 2018

नगर - झोपडपट्टीत वंचित मुलांसाठी "बालभवन'मध्ये "शिक्षण, आरोग्य आणि संस्कार' उपक्रम सुरू केला. आठ वर्षांत जवळपास पाच हजारांहून अधिक मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात आली. हजारापेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळाला. शिवाय वेगवेगळ्या उपक्रमातून झोपडपट्टीतले चित्र पालटले. नगरमध्ये सुरू असलेल्या "बालभवन'चे सहसंचालक हनीफ शेख यांच्या पुढाकारातून वंचितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तेरा वर्षांपासून काम सुरू आहे.

शहरात आठ झोपडपट्ट्या आहेत. तिथे हजारो कुटुंबाचा राबता महापालिकेसह अनेक खासगी नावाजलेल्या शाळा असल्या, तरी झोपडपट्टीतील मुले त्यांच्यापासून वंचित असायची. मात्र हनीफ शेख यांच्या पुढाकारामुळे या मुलांना हक्काचे प्राथमिकसह उच्च शिक्षण मिळू लागले. वंचितांच्या विकासाचे स्वप्न पाहणारा हनीफ नगरच्या झोपडपट्ट्यांमधल्या लोकांचा हक्काचा भाऊ बनला.

हनीफ जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍यातील आदिवासी भागातले. द्विपदवीधर. वडील पोलिसात असल्याने शिस्तीत वाढलेले. शाळा-कॉलेजात नेतृत्व करणारे. "कमवा आणि शिका'मधील सहभागामुळे सामाजिक कामांची गोडी लागलेले. घरच्या सामान्य परिस्थितीमुळे रंगकाम, वडापाव गाडीवर काम, रिक्षा चालवणे अशी पडेल ती कामे केली. नगरला स्थानिक वृत्तवाहिनीत काम करताना सामाजिक समस्यांची जवळून ओळख झाली. "स्नेहालय'चे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या संपर्कात आलेले हनीफ "स्नेहालय'चे स्वयंसेवक बनले. हरवलेल्या मुलीला शोधताना त्यांनी नगरचे बहुचर्चित सेक्‍स स्कॅन्डल उजेडात आणले. "स्नेहालय'ने 2005 मध्ये सुरू केलेल्या "बालभवन'ची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि झोपडपट्टीत काम सुरू केले.

हनीफ झोपडपट्टीसाठी "सेवावस्ती' शब्द वापरतात. नगरमधील संजयनगर भागात सुरवातीला कुष्ठरोग्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पहिले बालभवन सुरू झाले. सध्या शहरात सात ठिकाणी बालभवन आहेत. "लेकरांना शिकवाल तरच परिस्थिती बदलेल,' अशा शब्दांत झोपडपट्टीवासीयांचे प्रबोधन करत हनीफनी विश्‍वास दिला. त्यामुळे शाळेकडे पाठ फिरवलेली मुले शाळेकडे वळाली. आतापर्यंत अनेक मुले-मुली दहावी-बारावी, उच्च शिक्षणापर्यत पोचली आहेत. शहरातील नामांकित शाळा झोपडपट्टीतील मुले गुन्हेगारी प्रवृत्तीची असा ठपका ठेवून त्यांना प्रवेश देत नव्हत्या. हनीफ यांच्या पाठपुराव्याने 2 हजार 177 मुलांना शहरातील नामांकित शाळांत प्रवेश मिळालाय. सध्या हनीफ यांना प्रकल्प व्यवस्थापक शबाना युनूस शेख मदत करतात.

हनीफनी कधीही शाळेत न गेलेल्या 769 मुलांना शाळेत आणले. 317 बालकामगारांचे पुनर्वसन केले. 512 मुला-मुलींना संगणक शिक्षण दिले. त्यांच्या प्रयत्नामुळे 700 मुले रात्रशाळेत जातात. त्यांच्यासाठी "बालभवन'ने स्वतः अभ्यासक्रम बनवला. "बालभवन'मध्ये शिकणाऱ्या 140 मुलांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड झाली आहे.

"उमेद, सहारा'मधून आधार
वस्तीतल्या विधवा महिलांच्या हाताला काम देण्यासाठी "उमेद', तरुणांच्या रोजगारासाठी "सहारा सर्व्हिसेस', किशोरवयीन मुलांच्या समुपदेशनासाठी "कळी उमलताना- वयात येताना', असे उपक्रम सुरु आहेत. झोपडपट्टीतील जवळपास एक हजार महिलांना रोजगार उपलब्ध केले आहेत. झोपडपट्टीतील महिलांचे विविध बाबींवर समुपदेशन केले जाते.

झोपडपट्टीतलं दुखः खूप वाईट आहे. शिक्षण हाच दुःखमुक्तीचा उपाय आहे. येथील मुला-मुलींना विश्वास देण्याची गरज असते. शिक्षण, आरोग्य आणि संस्कार या बाबींना आम्ही प्राधान्य देतो. त्यामुळे शिक्षणापासून कोसो दूर मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली, याचे समाधान आहे.
- हनीफ शेख, सहसंचालक, बालभवन, नगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagar news education health for slum student