बहिणीने दिले भावाला किडनीदानातून जीवदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

गरिबांना मेडिकल, सुपर स्पेशालिटीचा आधार आहे. अलीकडे रुग्णांची संख्या वाढली आहे. सुपर स्पेशालिटीत किडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. किडनी प्रत्यारोपण युनिट उभारण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळत आहे. शासनाच्या पुढाकाराने सुपरचा विकास होत आहे. 
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.

नागपूर - रक्षाबंधनाचा सण येण्यापूर्वीच बहीण भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा किडनी प्रत्यारोपणातून जगवण्याचा सोहळा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार पडला. बावन्न वर्षीय बहिणीने आयुष्याच्या उत्तरार्धातील ६५ वर्षीय भावाला किडनी दान देऊन त्यांना बुधवारी (ता. १९) नवे जीवदान दिले. सुपर स्पेशालिटी गेल्या १५ महिन्यांत झालेले २० वे किडनी प्रत्यारोपण आहे.

देवीदास चहांदे असे किडनी स्वीकारलेल्या भावाचे नाव आहे, तर किडनी दान करणाऱ्या देवीदास यांच्या बहिणीचे नाव बेबी मते आहे. शरीरातील अनावश्‍यक घटकांना शुद्ध करणारे यंत्र म्हणजे किडनी आहे. शरीरात दोन किडनी असतात. काही कारणांमुळे दोन्ही किडनी खराब झालेल्या किडनीग्रस्तांना श्‍वास घेण्यासाठी ‘डायलिसीस’ एकमेव मार्ग आहे. परंतु, डायलिसिसवरील श्‍वास किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे, अशावेळी किडनीग्रस्तांना घरच्या मंडळीकडून किडनीदानातून नवे जीवदान दिले जाते. किडनीदानाचे हे प्रमाण अधिक आहे. गेल्या दीड वर्षापासून दारिद्य्ररेषेखालील असलेल्या किडनीग्रस्तांसाठी सुपर स्पेशालिटी वरदान ठरले आहे. बुधवारी मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या भावाला बहिणीने किडनीदान देऊन जीवनदान दिले. 

मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न सुपर स्पेशालिटीत युनिट सुरू झाले. विशेष असे की, महिला किडनीदानात आघाडीवर आहेत. सुपरमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या किडनी प्रत्यारोपणात महिलांनी किडनी दान केल्याचा आकडा १२ वर पोहोचला आहे. यात आतापर्यंत दोन बहिणींनी तर चार वेळा पत्नींनी किडनी दान केले आहे. उर्वरित जणांना मातेकडून, सासूकडून जीवदान मिळाले आहे. सुपरमध्ये बुधवारी झालेल्या किडनी प्रत्यारोपणासाठी ज्येष्ठ किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. संजय कोलते, नेफ्रोलॉजी विभागप्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. समीर चौबे, डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. विशाल रामटेके, डॉ. कुणाल मेश्राम, डॉ. विजय श्रोते यांच्यासह रक्त व जीवरसायन चाचणी करणारे डॉ. संजय पराते, डॉ. संजय सोनुने, डॉ. महाजन यांनी मोलाची कामगिरी निभावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news sister donate kidney to brother