बंधाऱ्याने वाढली विहिरींची पातळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

रामटेक - राजकारण आणि समाजसेवा ही परस्परपूरक अंगे आहेत. चांगला राजकारणी आपल्या कर्तृत्वाने गावाला नवी दिशा देतो. गावातील सर्वांच्या फायद्याला कारणीभूत ठरतो. अशीच कामगिरी नंदापुरी या गावातील भूमेश्वर चाफले या नवनिर्वाचित सरपंचांनी केली. गावाजवळून वाहणाऱ्या सांड नाल्यावर केवळ तीन फूट उंचीचा काँक्रिटचा बंधारा बांधला आणि पाहता पाहता त्या तीन फूट बंधाऱ्यामुळे एक किलोमीटर पाण्याची थोप तयार झाली. सरपंचपदाचा कार्यभार सांभाळण्यापूर्वीच त्यांनी ही कामगिरी सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडली, हे विशेष!

 नंदापुरी हे छोटेसे गाव. मुख्य व्यवसाय शेती. पेंच कालवा दुरून जातो. मात्र कालव्याचे झिरपलेले आणि शेतकऱ्यांनी बांधातील सोडलेले पाणी गावापासून दोन किमी अंतरावरील सांड नाल्यातून वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी थांबविण्यात आले तर फायदा होऊ शकतो, हे ओळखून भूमेश्वर चाफले यांनी ही कल्पना सहकारी सदस्य गुलाब चाफले, रामसिंग नागपुरे, दादाराव हटवार, मनोहर गुप्ता, राजहंस पिसोडे, प्रल्हाद पडोळे, रूपलाल सव्वालाखे, महेंद्र कस्तुरे, सूरज लिल्हारे, विनोद पिसोडे, जगन कुटराहे आणि इतरांना सांगितली. 

नंदापुरी- लोहडोंगरी रस्त्यावर ज्या ठिकाणी सांड नाल्यावर पूल आहे, त्या ठिकाणी तीन फूट उंचीची काँक्रिटची भिंत उभी केली. त्यावर सिंमेटच्या पोत्यात वाळू भरून ती त्या भिंतीवर ठेवली. 

कालव्याचे नाल्यात वाहून जाणारे पाणी त्या ठिकाणी साठू लागले आणि पाहता पाहता थांबलेल्या पाण्याची थोप एक किलोमीटरपर्यंत झाली. त्या साठवलेल्या पाण्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढली.

शेतकऱ्यांना फायदा
 नंदापुरी गावासाठी असलेल्या नळयोजनेच्या विहिरीच्या  पाण्याच्या पातळीतही वाढ झाली. हा बंधारा बनवण्यासाठी खर्च केवळ २५ हजारापर्यंत आला. सिमेंट, वाळू, लोखंड आणि मजुरी हा सर्व खर्च यात आला आहे. माजी आमदार आशीष जयस्वाल यांनी बंधारा प्रत्यक्ष पाहिला आणि त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नाल्याच्या खोलीकरणासाठी  मदत करण्याचे आश्वासन दिले. असा उपक्रम राबविल्यास त्याचा फायदा शेतीसाठी आणि विहिरींचीची पाण्याची पातळी राखण्यासाठी होईल. त्यामुळे गावकऱ्यांनी असे उपक्रम राबवावेत, असे आवाहन जयस्वाल यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news The waer level of wells increased by bandhara