सायली वाघमारेने इतिहास घडविला

सायली वाघमारेने इतिहास घडविला

आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्‍स स्पर्धेत जिंकले प्रथमच सुवर्ण, पी. टी. उषाच्या शिष्यावर केली मात

नागपूर - ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मातीच्या मैदानावर सराव करणाऱ्या सायली वाघमारेने आचार्य नागार्जुना विद्यापीठाच्या यजमानपदाखाली गुटूंर येथे  आयोजित ७८ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्‍स स्पर्धेत महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला. तिने विपरीत परिस्थितीत ही कामगिरी करताना उडणपरी पी. टी. उषाची शिष्य अबिता मेरी मॅन्युअलवर मात केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायलीने गुरुवारी झालेल्या अतिशय चुरशीच्या अंतिम फेरीत दोन मिनिटे ०९.९० सेकंद इतकी वेळ नोंदवित पहिल्यांदाच सुवर्णपदकावर नाव कोरले. सायलीने यापूर्वी मॅंगलोर (२०१५-१६) व कोईम्बतूर (२०१६-१७) मध्ये झालेल्या आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्‍स स्पर्धेत रौप्यपदके जिंकली होती. चौथ्या प्रयत्नात सुवर्ण जिंकणाऱ्या सायलीने मॅंगलोर येथील स्पर्धेत नोंदविलेल्या (२:११:०१ सेकंद) या वेळेत सुधारणा करताना करिअरमधील सर्वोत्तम वेळेची नोंद केली.

सायलीचे हे राष्ट्रीय स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक होय. याआधी तिने २०१५ मध्ये रांची येथील राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नागपूर विद्यापीठाच्या  आतापर्यंतच्या इतिहासात पुरुष व महिला गटात ८०० मीटर शर्यतीमध्ये हे पहिलेच सुवर्ण ठरले. यापूर्वी योगेश ठाकरे आणि प्रकाश वर्मा यांनी या प्रकारात रौप्यपदकांची कमाई केली होती.

क्रीडाप्रेमींचे आकर्षण ठरलेल्या या शर्यतीत सायलीची सुरुवात थोडी संथच झाली. मात्र,  शेवटच्या अडीचशे मीटरमध्ये तिने वेग वाढविला. शर्यतीच्या अंतिम टप्प्यातील  १२० मीटर अंतर शिल्लक असताना सायलीने भन्नाट धाव घेत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या प्रकारात पी. टी. उषाची शिष्या अबिता मेरी मॅन्युएलला सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात होते. शिवाय गतवर्षीची सुवर्णपदक विजेती मद्रास विद्यापीठाची के. प्रिया हीदेखील शर्यतीत प्रमुख दावेदारांपैकी एक होती.

सायलीने दोघींनाही सहज मागे टाकत नागपूर विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. अमृतसरच्या टिंवकल चौधरीने (२ मिनिटे  १०.६२ सेकंद) रौप्यपदक आणि के. प्रियाने (२ मिनिटे १०.७६ सेकंद) ब्राँझपदक जिंकले.

धरमपेठ मुंडले महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या २१ वर्षीय सायलीने गेल्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या वेळी स्नायू दुखावल्यानंतरही राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात (अश्‍वमेध) पदक जिंकले होते. गुंटूर येथील धमाकेदार कामगिरी तिने फिटनेस, स्टॅमिना व क्षमतेचा जगाला परिचय करून दिला. कदाचित त्यामुळेच शर्यतीनंतर अनेकांनी तिचे कौतुक केले. सायली ॲथलेटिक्‍स प्रशिक्षक भाऊ काणे आणि जितेंद्र घोरदडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

ओएनजीसीतर्फे शिष्यवृत्तीची ऑफर
सायलीने आठशे मीटर शर्यतीत केलेली ऐतिहासिक कामगिरी बघून ओएनजीसीने तिला शिष्यवृत्तीची ऑफर दिली. शर्यत संपल्यानंतर लगेच ओएनजीसीमध्ये कार्यरत माजी आशियाई पदकविजेते धावपटू घमंडाराम यांनी सायलीची भेट घेऊन तिला दरमहा दहा हजारांची शिष्यवृत्ती देण्याचे आश्‍वासन दिले. येत्या एक-दोन दिवसांत यासंदर्भात ती होकार दर्शविणार आहे.

स्पर्धेत अबिता व प्रियासारख्या दर्जेदार धावपटू, स्पर्धेतील एकूणच चुरस व स्टॅण्डर्ड लक्षात घेता सुवर्णपदकाची मुळीच अपेक्षा नव्हती. मात्र, तीनपैकी एका पदकाबद्दल नक्‍कीच आशावादी होते. शर्यतीचे शेवटचे अडीचशे मीटर शिल्लक असताना आपण सुवर्ण जिंकू शकतो, असे वाटू  लागले. त्यावेळी मी सर्व ताकद झोकून दिली. सुवर्णपदक जिंकल्याचा खरोखरच मनापासून  आनंद झाला.
- सायली वाघमारे, राष्ट्रीय धावपटू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com