डिलिव्हरी बॉयचे बारावीत सुयश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

विक्रोळी - सुखवस्तू कुटुंब अन्‌ खासगी शिकवणी असेल तर परीक्षेत यश मिळवणे वेगळे आणि घरातील अशिक्षितपणा, गरिबी, कष्ट आदी प्रतिकूल गोष्टींवर मात करीत स्वप्नाच्या दिशेने झेप घेणे वेगळे... विक्रोळीत गॅस सिलिंडरची ओझी वाहणारा नाना शेंबडे याने अशी झेप घेतली आहे. मोठ्या जिद्दीने अभ्यास करून त्याने बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेतून ५२ टक्के गुण मिळवले.

महाविद्यालयीन शिक्षण घेण्याच्या वयात नानाच्या खांद्यावर परिस्थितीमुळे सॅकऐवजी सिलिंडर आला. उदरनिर्वाहासाठी शिक्षण अर्धवट सोडून नाना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील दहीवाडी गावाहून मुंबईत आला. एका गॅस कंपनीत त्याने डिलिव्हरी बॉयची नोकरी स्वीकारली. त्याचे दहावीचे शिक्षणही पूर्ण झाले नव्हते. घरोघरी सिलिंडर पोहचवायचे काम मात्र सुरू झाले. दरम्यानच्या काळात त्याने विक्रोळीतील ‘शारदा’ रात्रशाळेत दहावीसाठी प्रवेश घेतला. तिथे त्याला मार्गदर्शन करणारे आणि जीव लावणारे शिक्षक मिळाले. परिणामी पहिल्याच प्रयत्नात तो दहावी उत्तीर्ण झाला. गॅस डिलिव्हरी करण्याच्या परिसरातच शाळा आणि नंतर दोन वर्षे त्याने कॉलेजही केले. दिवसभर सिलिंडर घेऊन आणि जिने वर-खाली करून शारीरिक थकवा यायचा. शरीर थकून जायचे. अजिबात ताकद उरायची नाही. तरीही नानाचा शिकायचा निर्धार पक्का होता. वेळ मिळेल तसा मी अभ्यास करत गेलो आणि पास झालो, असे नानाने सांगितले. 

आपल्या यशाचे श्रेय नाना आपले भावोजी संतोष मानवर, मारुती शेळके, मुख्याध्यापक जयवंत पाटील आणि शिक्षक संजय सोनटक्के यांना देतो. बारावीतील यशाने नानाचा आत्मविश्‍वास वाढला असून त्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nana shembade story