भोयेगाव पोचवले ‘ओझस’ नामांकन यादीत

कुणाल संत
सोमवार, 19 मार्च 2018

महाराष्ट्राला भूषणावह अन्‌ अनुकरणीय ठरेल, अशा गावांनी नावीन्याची गुढी उभारली आहे. पायभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा अशा अनेकविध क्षेत्रांतील कार्याचा घेतलेला मागोवा आजपासून...

महाराष्ट्राला भूषणावह अन्‌ अनुकरणीय ठरेल, अशा गावांनी नावीन्याची गुढी उभारली आहे. पायभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा अशा अनेकविध क्षेत्रांतील कार्याचा घेतलेला मागोवा आजपासून...

नाशिक - जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल वरचेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यास अपवाद ठरलीय भोयेगाव (ता. चांदवड) येथील जिल्हा परिषदेची शाळा. शिक्षक अन्‌ ग्रामस्थांनी शाळेला ‘ओझस’ मानांकन यादीत पोचवलंय. राज्यातील दहा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये समावेश होण्यासाठीची ही संधी निर्माण झाली आहे. याच शाळेने ‘आयएसओ’ मानांकनही मिळवले आहे. शिक्षण पद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण बदल करत शाळेत दर शनिवारी ‘नो बॅग डे’ उपक्रम राबवला जातो.

दर्जेदार शिक्षण, डिजिटल क्‍लास-रूम, सुसज्ज इमारत, २४ तास मोफत ‘वायफाय-ब्रॉडबॅंड’ सुविधा, ‘बॉटनिकल गार्डन’ अशा उपक्रमांद्वारे भोयेगावच्या शाळेने राज्यभर ओळख निर्माण केली आहे. २६७ पटसंख्येच्या या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता सुमार होती, पण शाळेतील शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती अन्‌ ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचा भौतिक सुविधांच्या जोडीला गुणवत्तेचा दर्जा उंचवण्याचा संकल्प केला. परिणामी, डिसेंबर २०१४ मध्ये या शाळेने २०० पैकी १९९ गुण संपादन करत ‘अ’ श्रेणीचा बहुमान संपादला. सर्वच क्षेत्रांत शाळेने बदलांची प्रक्रिया कायम ठेवली. खासगी कंपन्यांचा ‘सीएसआर’ निधी मिळविण्यात ही शाळा जिल्ह्यात अव्वल ठरली. जिल्ह्यात सर्वप्रथम या शाळेने ‘आयएसओ’ मानांकन मिळवले.   

उपक्रमांची मांदियाळी
‘माझी अभ्यासिका’अंतर्गत वाचनालय, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनकट्टा, एक मूल ः एक झाड संकल्पना, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’मधून जलसंवर्धनाचे धडे, प्रत्येक वर्गामध्ये स्वतंत्र संगणक आणि टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेवर आधारित वस्तूंची निर्मिती, डिजिटल बोर्ड, इनडोअर खेळ, बोलक्‍या भींती, कचऱ्याचे व्यवस्थापन, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी खास ‘स्पोकन इंग्लिश ॲक्‍टव्हिटी’, अशा उपक्रमांची कार्यवाही शाळेत करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news bhoyegaon zp school in ozas list