आयशरमधील अनोखे सलून खुणावतेय ग्राहकांना

प्रशांत देशमुख
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

संतोष शिंदे यांनी संघर्षावर मात करीत केली ध्येयपूर्ती
लॅम रोड - वयाच्या दुसऱ्या वर्षी पितृछत्र हरपले. आईने मोलमुजरी करून वाढविले. पत्नीला दहा वर्षांपूर्वी कर्करोगाने घेरले. या परिस्थितीत संतोष शिंदे यांनी नातेवाइकांच्या सलूनमध्ये काम करून उदरनिर्वाह चालविला; परंतु स्वत:चे दुकान एखाद्या वाहनात सुरू करावे, असा विचार त्यांच्या मनात घोळत होता. ध्येयपूर्ती करण्यासाठी स्वत:चे घर विकून त्यांनी जुनी आयशर घेऊन त्यात सलून थाटले आणि सुरू झाला नवले चाळीजवळील उड्डाणपुलाखाली स्वत:चा व्यवसाय.

मूळच्या सिन्नर तालुक्‍यातील निमगाव येथील रहिवासी असलेले संतोष शिंदे वडिलोपार्जित सलूनचा व्यवसाय निफाड येथील त्यांच्या नातेवाइकाच्या दुकानात शिकले. तेथे पाच-सहा वर्षे काम केल्यानंतर ही कला दोन भावंडांनाही त्यांनी शिकवली. नाशिक रोड येथे नातेवाइकांचे एक दुकान चालविण्यास घेऊन आपला प्रपंच सांभाळला. दरम्यान, स्वत:चे दुकान असावे आणि तेही चारचाकी वाहनात, हा विचार त्यांच्या डोक्‍यात घोळत होता; परंतु आर्थिक परिस्थिती कममुवत असल्याने ते जमत नव्हते. कर्करोगाने आजारी पत्नीने त्यांच्या या संकल्पनेला साथ देत पाठिंबा दिला; परंतु त्यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांनी पळसे येथील आपले घर विकले. त्या पैशातून गेल्या महिन्यात एक जुनी आयशर गाडी घेतली. तिला आतून एखाद्या सलूनप्रमाणे अतिशय सुबकतेने सजविले आणि गणेशोत्सवाच्या काळात चारचाकी वाहनातील सलूनची ध्येयपूर्ती केली. 

जीवनात अनेक चढ-उतार व अडचणी आल्या. त्यामुळे मानसिक त्रासही झाला. परंतु खचलो नाही. स्वतःच्या गाडीमध्ये दुकान असायला हवे हा विचार मनात घोळत होता. हे ध्येय गाठण्यासाठी घरातील कुटुंबीयांनी, काही नातेवाईक व मित्रांनी साथ व प्रेरणा दिली. त्यामुळे ते पूर्ण करू शकलो.
- संतोष शिंदे, सलूनचालक

अनोखे सलून पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
नवले चाळीत त्यांनी आठ वर्षांपूर्वी गाळा भाडेतत्त्वावर घेऊन तेथे सलून सुरू केले होते. त्यामुळे हे चालतेफिरते सलून शहरात कुठेही न फिरविता याच भागात उड्डाणपुलाखाली उभे करून तेथे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आयशरमध्ये दुकान सजविण्यासाठी त्यांना सहा लाख रुपये खर्च आला. सकाळी आठपासून ते रात्री नऊपर्यंत त्यांचे सलून सुरू असते. या आगळ्यावेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या सलूनला पाहण्यासाठी नागरिक आजही गर्दी करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news saloon center in eicher vehicle