एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये २१ बालकांना नवसंजीवनी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया ही जोखमीचीच बाब होती. मात्र, त्यामुळे संबंधित बालकांचे नवीन आयुष्य सुरू झाले आहे. अजूनही ज्यांच्या शस्त्रक्रिया करायच्या आहेत, त्यांनी एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटशी संपर्क साधावा. 
- डॉ. गौरव वर्मा, एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट

नाशिक - धावणे-पळणे याबरोबरच धडपड न करणे, चार पावले चालला तरीही दम लागणे, चेहऱ्यावर थकवा, निरागस चेहऱ्यांवरचा हरवलेला आनंद, पालकांपुढे निर्माण झालेला प्रश्‍न, निदान झाले मात्र शस्त्रक्रिया करावयाची कुठे अशा प्रश्‍नांना आज विराम देण्यात आला. येथील एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये जन्मत:च हृदयाला छिद्र असलेल्या २१ बालकांवर अत्यंत कठीण हृदयशस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. मुलांवर उपचार करण्यात येऊन त्यांना नवजीवन देण्यात आले. शस्त्रक्रिया केलेल्यांमध्ये अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याची ओपन हार्ट सर्जरीही यशस्वीरीत्या करण्यात आली. वर्षभरात १६५ बालकांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

ही बालके नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यांतील आहेत. विनाचिरफाड, छत्रीने हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या. सकाळी सातपासून रात्री नऊपर्यंत प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा आणि देशभरातून आलेल्या बालहृदयरोग तज्ज्ञांच्या विशेष टीमने या शस्त्रक्रिया केल्या. शरीराचा रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या कप्प्याला शक्‍यतो या शस्त्रक्रियेत धक्का लावला जात नाही. शस्त्रक्रिया करण्यासाठी अद्ययावत वैद्यकीय उपकरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्‍यक असते. ही सुविधा उत्तर महाराष्ट्रात ‘एसएमबीटी’च्या हृदय उपचार केंद्रात आहे. येथे ४० खाटांचा स्वतंत्र हृदयरोग अतिदक्षता विभाग, ३ डी-४ डी, इकोकार्डिओग्राफी, ॲल्युरा एक्‍सपर एफडी-१० कॅथलॅब, टीएमटी, सेंट्रल पॅथॉलॉजी, अत्याधुनिक रेडिओलॉजी, स्वतंत्र रक्तपेढी, कार्डियाक ॲम्ब्युलन्स आदी सेवा २४ तास आहेत. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर इम्प्लांट, बलून, बायपास, जन्मजात हृदयरोगावर उपचार, हृदयाचे छिद्र, लहान मुलांचा हृदयरोग आदी प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत केल्या जातात. या लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच आमचा यशस्वीतेची पावती असल्याचे ‘एसएमबीटी’च्या संचालकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news SMBT heart institute nashik children