‘त्यांना’ मिळाले आई-बाबा

ॲड. धर्मेंद्र चव्हाण 
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

नाशिक - मम्मी-पप्पांच्या भांडणात संसाराची अक्षरशः वाट लागते. वर्षानुवर्षे प्रकरण न्यायालयात चालते. न्याय मिळण्यापेक्षा मनस्तापच अधिक पदरात पडतो. बिचाऱ्या चिमुरड्यांना मात्र दोघांचे प्रेम हवे असते; परंतु भांडणात त्यांचे जीवन रुक्ष होते. हा रुक्षपणा घालविण्यासाठी मध्यस्थी जनजागृती अभियानाने पुढाकार घेतला आणि रुक्ष जीवनात आशेचे रोपटे फुलले. चिमुरड्यांना आई-बाबा मिळाले आणि त्यांच्यामुळे दुरावलेले माता-पिता जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली.    

मध्यस्थी जनजागृती अभियान आणि बाल दिनाचे औचित्य साधून ॲड. बाळकृष्ण मोरे, ॲड. अकिल सिमना, ॲड. राजेंद्र चंद्रमोरे यांनी आई-वडिलांच्या प्रेमापासून दुरावलेल्या मुलांना एकत्र आणण्याचा अनोखा उपक्रम राबविला. राज्यात पहिल्यांदाच न्यायालयात अशा प्रकारची संकल्पना साकारण्यात आली होती. मध्यस्थी जनजागृती अभियानाच्या निमित्ताने पालकांना आपल्या मुलाबरोबर राहण्याची संधी देण्यात आली. चिमुरड्यांनी न्यायालयात मनोमिलनानिमित्ताने स्नेहसंमेलनात विविध गुणदर्शनाची झलक सादर केल्याने कौटुंबिक न्यायालयातील नेहमीचे तणावाचे आणि भीतीचे वातावरण भारावून गेले होते. या वेळी न्यायाधीश कविता ठाकूर, महिला व बालकल्याण समितीच्या अधिकारी सुरेखा पाटील, जिल्हा सरकारी वकील सुधीर कोतवाल, नगरसेविका ॲड. कोमल मेहेरोलिया आदींनी मार्गदर्शन केले. न्यायालयाच्या आवाराला कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे स्वरूप आले होते. मुलांनी केक कापून कार्यक्रमाला सुरवात केली. या वेळी गाणी, वेशभूषा सादर करताना टाळ्या वाजवताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. मुलांच्या कौतुकात सारा समुदाय तासभर रममाण झाला होता. ॲड. मेहेरोलिया यांच्या विभागातील अनाथ शाळेतील २५ मुलेही या सोहळ्यात सहभागी झाली होती. म्युझिक वर्ल्डचे किशोर सोनवणे यांनी कार्यक्रमासाठी संगीत साथ विनामोबदला दिल्याने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. मम्मी-पप्पांना भेटल्यावर आपली कला सादर करणाऱ्या चिमुरड्यांत अवनीश सोनवणे, अरुण असरानी, जाज्ज्वल देशपांडे, वीणा गवांदे, मही सुरसे, रिदान संत, श्रवणी राणे, वैष्णवी शिंपी आदींचा समावेश होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news social