सुरक्षित सोशल मीडिया हाताळू, स्वसंरक्षणही करू!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नाशिक - अनाहूतपणे उभ्या राहणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी शाळकरी मुलींना सोशल मीडिया सुरक्षित हाताळण्याबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे महिला पोलिसांनी दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्‍वास उंचावल्याचा आणि जगण्यास ऊर्मी, बळ मिळाल्याची भावना दिसली.

नाशिक - अनाहूतपणे उभ्या राहणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी शाळकरी मुलींना सोशल मीडिया सुरक्षित हाताळण्याबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे महिला पोलिसांनी दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्‍वास उंचावल्याचा आणि जगण्यास ऊर्मी, बळ मिळाल्याची भावना दिसली.

सेवाभावी वृत्तीने काम करणारी ‘नन्हीं कली’ संस्था आणि नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे गेल्या दोन वर्षांपासून शहरात हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम मुलींना भावला असून, यशस्वी नियोजनामुळे महापालिका शिक्षण विभागाच्या सुमारे ३३, तर शहरालगतच्या जिल्हा परिषदेच्या ३४ शाळांत हा उपक्रम पोचला आहे. खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना सर्वतोपरी सोयी-सुविधा उपलब्ध होतात. मात्र, सरकारी शाळांमध्ये याविरुद्ध चित्र पाहायला मिळते. या शाळकरी मुलींना समाजातील वाईट प्रवृत्तींची ओळख व्हावी, तसेच निर्माण झालेल्या प्रसंगांना यशस्वी तोंड देण्याची वृत्ती बळावली जावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

नन्हीं कलीही झाल्या तरबेज
आज दहा हजार ६५० शाळकरी मुलींच्या हाती शैक्षणिक टॅब पोचले आहेत. सायबर पोलिसांकडून या मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे अत्याचार व सोशल मीडिया सुरक्षित कसा हाताळायचा, याचेही धडे गिरवायला मिळत आहेत. कधी बाका प्रसंग उद्‌भवला तर त्यास न डगमगता समर्थपणे तोंड देण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणही दिले. त्यासाठी पोलिस आयुक्तालयाने आम्रपाली पगारे, नेहा खोब्रागडे, पल्लवी गांगुर्डे, सुवर्णा शेजवळ व मनीषा ताजनपुरे या महिला पोलिस कर्मचाऱ्यांची शाळेय मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी नेमणूक केली. सुटीच्या कालावधीत ११ हजार मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले आहे.

अधिकाऱ्यांकडून समुपदेशन
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, परिमंडल दोनचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त माधुरी कांगणे, अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कड यांनी वेळोवेळी महापालिका शाळांत हजेरी लावत मुला-मुलींचे समुपदेशन केले. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल पवार यांनी सायबर गुन्हे व सोशल मीडियाचा वापर याविषयी मुलींना खास बाबींची कल्पना दिली. 

नन्हीं कली या उपक्रमातून पोलिसांनी शाळकरी मुलींना लक्ष्य करून त्यांना सोशल मीडियाबाबत सज्ञान करण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिल्याने किमान वेळप्रसंगी त्या स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रतिकार करू शकतील. 
- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त, नाशिक
 

पोलिसांच्या सहकार्याने शाळकरी मुलींना स्वसंरक्षण व आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध झाली. या मुली टॅबवर शिक्षण घेतात. स्वसंरक्षणातून स्वत:चा बचाव करू शकतात, हेही प्रयत्न कमी नाहीत. 
- ज्योती वाकचौरे, समन्वयक, नन्हीं कली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news social media