esakal | कुस्तीनं दुणावला जगण्याचा आत्मविश्‍वास
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्तीनं दुणावला जगण्याचा आत्मविश्‍वास

कुस्तीनं दुणावला जगण्याचा आत्मविश्‍वास

sakal_logo
By
दत्तात्रेय ठोंबरे

नाशिक - भटक्‍या विमुक्त कुटुंबातील जन्म. घरात अठराविश्‍व दारिद्य्र...दोनवेळच्या भाकरीची भ्रांत. चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यावर हाता-तोंडाची गाठ पडण्यासाठी शिक्षण सोडून हॉटेलमध्ये काम पत्करले. प्रामाणिकपणातून हॉटेल मालकाचाही विश्‍वास कमावला अन्‌ मालकाने तालीम संघाचे पदाधिकारी गोरखनाथ बलकवडे यांच्याशी परिचय करून दिला. त्यांनी आधार देत शाळेची सोय केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कुस्तीतील पदके मिळवली अन्‌ पोलिस दलात भरती झालो. ही कहाणी आहे नगरमध्ये कार्यरत पोलिस निरीक्षक दशरथ हाटकर यांची.

पोलिस शिपाई म्हणून भरती झाल्यावर तेवढ्यावर धन्यता मानण्याऐवजी मेहनत अन्‌ चिकाटीची जोड हाटकर यांनी दिली. त्यातूनच त्यांना पोलिस निरीक्षकपदापर्यंत मजल मारता आली. ते मूळचे सिन्नरचे. पांढुर्ली गावात चौथीपर्यंत शिक्षण झाले. घरच्या बेताच्या आर्थिक स्थितीमुळे शिक्षण सोडले. भगूर येथील शिवाजी चौकातील हॉटेलमध्ये कामाला सुरवात केली. इथे त्यांचा बलकवडे यांच्याशी परिचय झाला. अर्थात हॉटेलमालकांना आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षण सोडावे लागल्याची माहिती दिल्याने दशरथबद्दल बलकवडेंच्या मनात मायेचा ओलावा वाढला. ‘‘नानांनी (बलकवडे) मला भेटायला बोलावले. त्यानंतर लगेच मला काम बंद करायला सांगून दहा बाय दहाच्या खोलीत राहण्याची व्यवस्था केली. भगूरच्याच ति. झ. विद्या मंदिरमध्ये शिक्षणाची सोय केली. त्यासाठीचा खर्च त्यांनीच केला,’’ अशा शब्दांत हाटकर यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘मला व्यायामाची आवड होती. त्यामुळे नानांनी माझ्याकडून भरपूर मेहनत करून घेतली. कुस्तीचे डाव शिकवले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे 

सातवीत असताना 
कुस्तीत पहिले पदक मिळाले. कुस्तीचा प्रवास सुरू झाला. राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा चंडीगडला खेळलो. पराभूत झालो. तो पराभव माझ्यापेक्षा नानांच्या जिव्हारी लागला. ते मला पाहावले नाही. पुन्हा जोमाने तयारी केली. पुढील वर्षी राष्ट्रीय पदक मिळवले. त्यानंतर नावलौकीक होऊ लागला. मग मी बाकीचे काम बंद केले. कुस्तीच्या हंगामात सत्तर ते ऐंशी हजार रुपये कमावू लागलो. बारावी झाल्यावर नानांनी मला तू नोकरी शोध, असे सांगितले. वयाची १८ वर्षे झाल्यावर पोलिस भरतीसाठी गेलो. तेव्हाचे अधिकारी श्रीवास्तव माझी शरीरयष्टी पाहून प्रभावित झाले. खेळाडू असल्याने लगेचच 
भरती झालो. नानांनी शिस्तीचा पाठ घालून दिल्याने त्याचा उपयोग पोलिस दलात जाण्यास झाला. 

पोलिस शिपाई, नाईक, हवालदार, पोलिस उपनिरीक्षक असा एकेक टप्पा पूर्ण केला.’’ हे सांगताना हाटकरांचा कंठ दाटून आला. बलकवडेंनी मदतीचा हात दिला नसता तर आपले आयुष्य वेगळेच घडले असते, असे  ते म्हणाले.

दशरथची शरीरयष्टी दणकट होती. त्याच्यामाध्ये शिक्षणाची आवड होती, हे ध्यानात आल्याने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्याला कुस्तीचेही शिक्षण दिले. होतकरू दशरथने तालमीचे नाव मोठे केले. त्याचा खूप अभिमान वाटतो.
- गोरखनाथ बलकवडे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा तालीम संघ

loading image