राष्ट्रीय जलतरणपटूचा पोहायला शिकविण्याचा सेवाभाव

बी. डी. चेचर
गुरुवार, 16 मे 2019

सेवाभावाचे प्रतीक असलेली राष्ट्रीय जलतरणपटू महेश्‍वरी झुंजार सरनोबत या खेळाडूने व्रतस्थ भूमिका घेत लहान मुले व महिलांना स्वत:च्याच टॅंकमध्ये पोहायला शिकविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या १४ वर्षांपासून अखंडपणे त्यांनी शेकडो मुले व महिलांना पोहण्याच्या कलेत निपुण केले आहे. 

कोल्हापूर - कोल्हापूरचे दातृत्व जसं प्रसिद्ध आहे, तशी इथली माणसंही. सेवाभावी वृत्ती काय असते, हे पाहायचे असेल तर कोल्हापुरातच यावं. याच सेवाभावाचे प्रतीक असलेली राष्ट्रीय जलतरणपटू महेश्‍वरी झुंजार सरनोबत या खेळाडूने व्रतस्थ भूमिका घेत लहान मुले व महिलांना स्वत:च्याच टॅंकमध्ये पोहायला शिकविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या १४ वर्षांपासून अखंडपणे त्यांनी शेकडो मुले व महिलांना पोहण्याच्या कलेत निपुण केले आहे. 

महेश्‍वरी यांनी जलतरण स्पर्धेत देशपातळीवर सहा सुवर्णपदकांसह मालवण येथील समुद्राच्या पोहण्याच्या स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. कोल्हापुरात झालेल्या डेक्कन हाफ आयर्नमॅन रेस यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. अनेक नामवंत स्पर्धांत सुवर्णभरारी मारणाऱ्या महेश्‍वरी यांनी सामाजिक दायित्वही तेवढेच महत्त्वाचे मानले. पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेताना लहान मुुले व महिलांना पाठबळ नसल्याने ते या कलेपासून दूर होत असल्याचे जाणवले. हे पाहून त्यांनी मुले व महिलांना मोफत शिकविण्याचे ठरविले. 

जुना वाशी नाका, खामकर कॉलनी येथे घराच्या परिसरात परसबागेची मोठी जागा होती. त्या जागेवर बागेबरोबरच छोटासा जलतरण तलाव बांधला. पतीही जलतरणपटू असल्याने त्यांच्या प्रयत्नाला बळ मिळाले. त्यांची मुले जिथे शाळेला होती, तेथील मुख्याध्यापिका ऊर्मिला शिंदे यांनी त्यांना प्रोत्साहित केले. यातूनच या उपक्रमाची सुरवात झाली. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जुलै महिन्यात ते मुले व महिलांना पोहायला शिकवतात. पोहायला शिकल्यानंतर मुले व महिलांच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद त्यांना बळ देतो. त्यांना उत्साह आणतो. त्यांच्या उपक्रमाची माहिती अनेक ठिकाणी पोचल्याने प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जुलैअखेर त्यांच्या घराच्या परिसरात पोहण्याची 
शाळाच भरते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Swimmer Maheshwari Sarnobate teach swimming to boys in his own tanks