आठ किलोमीटर पायपीट करत यशाला गवसणी

सुनील शेडगे
मंगळवार, 16 जुलै 2019

आई, वडिलांनी दिलेली जिद्दीची शिदोरी यशाच्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरली. परिस्थिती प्रतिकूल असूनही केवळ त्यांच्या आधारामुळेच हे यश मिळवू शकलो. 
- नितीन ढवळे, म्हाते मुरा, ता. जावळी

नागठाणे - शाळेसाठी दररोज आठ किलोमीटरची पायपीट करणारा, शिक्षणासाठी पाच ओढे ओलांडणारा दुर्गम भागातील युवक भारतीय नौदलात भरती झाला आहे. आकाशाला गवसणी घालाणारे त्याचे हे यश सर्वांसाठी कौतुकाचा विषय बनले आहे.

नितीन बाबूराव ढवळे हे आहे या युवकाचे नाव. नितीन म्हाते मुरा (ता. जावळी) या गावाचा रहिवासी. दुर्गम भागात डोंगरउंचावर असलेले हे गाव.

नितीन धनगर समाजातील. त्यामुळे शिक्षणाची त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी यथातथाच. अशा परिस्थितीत त्याचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतच झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीचे शिक्षण त्याने म्हाते खुर्द येथील प्राथमिक शाळेत घेतले. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी तो म्हाते बुद्रुकच्या हायस्कूलमध्ये दाखल झाला. त्यानंतर अकरावी व बारावी त्याने मेढा येथील वेण्णा हायस्कूलमधून पूर्ण केली. अर्थात त्याचा शिक्षणाचा हा सारा प्रवास थक्क करणारा आहे. तो जितका विलक्षण कष्टाने भरलेला आहे, तितकाच अथक जिद्दीचाही आहे. त्याचे कारण नितीनचे गाव डोंगरावर.

म्हाते खुर्द, म्हाते बुद्रुक अन्‌ मेढा ही गावे पायथ्याशी असणारी. त्याला तिथंपर्यंत पोचण्यासाठी दररोज आठ किलोमीटरची पायपीट करावी लागत असे. इतके कमी काय, म्हणून तब्बल पाच ओढे पार करावे लागत असत. मात्र, अंगी जिद्द अन्‌ चिकाटी भरलेल्या नितीनने कधीही हार मानली नाही.

तो भारतीय नौदलात भरती झाला आहे. त्याचे आजवरचे कष्ट सार्थकी लागले आहेत. मोहन भोसले, अशोक लकडे, दीपक भुजबळ, शंकर पवार, सौ. भिलारे, अमोल लकेरी, सतीश धरम यावेळी भेटलेल्या शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे नितीन आवर्जून नमूद करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Dhawale Indian Navy Job Success Motivation