आपल्या डोळ्यांतून अनुभवणार ‘ती’ हे जग

- स्वप्नील जोगी
रविवार, 12 मार्च 2017

चिमुकल्या निविताचे मरणोत्तर नेत्रदान; आई-वडिलांचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे - ज्या वयात कित्येक जण नुकतेच कुठे आपल्या चिमखड्या बोलांनी आसपासच्यांना मोहवून टाकू लागलेले असतात, आपल्या बाललीलांनी अनेकांना लळा लावू लागलेले असतात अन्‌ या भव्य जगाशी ज्यांची नुकतीच कुठं स्वतंत्रपणे ओळख होऊ लागलेली असते, अशा बालवयातच निविता हे जग सोडून निघून गेली. आपल्या आई-बाबांच्या, लाडक्‍या दीदूच्या, आजी-आजोबांच्या...अन्‌ अगदी स्वतःच्याही नकळत अचानकच एका दुर्दैवी क्षणी!

चिमुकल्या निविताचे मरणोत्तर नेत्रदान; आई-वडिलांचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे - ज्या वयात कित्येक जण नुकतेच कुठे आपल्या चिमखड्या बोलांनी आसपासच्यांना मोहवून टाकू लागलेले असतात, आपल्या बाललीलांनी अनेकांना लळा लावू लागलेले असतात अन्‌ या भव्य जगाशी ज्यांची नुकतीच कुठं स्वतंत्रपणे ओळख होऊ लागलेली असते, अशा बालवयातच निविता हे जग सोडून निघून गेली. आपल्या आई-बाबांच्या, लाडक्‍या दीदूच्या, आजी-आजोबांच्या...अन्‌ अगदी स्वतःच्याही नकळत अचानकच एका दुर्दैवी क्षणी!

दोनच दिवसांपूर्वी झालेल्या आपल्या वाढदिवसाच्या अनेक गमतीजमती पोटाशी घेऊन अन्‌ डोळ्यांत साठवून ती अशी निघून गेली. पण हो, जाताना अनेकांना चटका लावून जाणारी इवलीशी निविता आता आपल्या डोळ्यांतून दुसऱ्या कुणाचीतरी स्वप्न पूर्ण करणार आहे. मरणोत्तर नेत्रदानाने तिने इतरांना जगण्याचा आनंद देऊ केला आहे. अपघाती मृत्यूने सगळ्यांनाच सुन्न करून जाणाऱ्या तीन वर्षांच्या निविताची ही कहाणी. नुकतीच कुठे तीन वर्षांची झालेली आणि बोबडे बोल बोलू लागलेली निविता गुरुवारी सकाळी जेव्हा अचानकपणे हे जग सोडून निघून गेली, तेव्हा तो सगळ्यांसाठीच मोठा धक्का होता. आजवर एकदाही घरातल्या ज्या बाल्कनीच्या भिंतीवरून साधं डोकावून पाहणंही जिला जमलं नव्हतं, ती पहिल्यांदाच तसं करायला गेली आणि त्यातच तोल जाऊन तिचा दुर्दैवी अंत झाला. घरातल्यांसह इतरांनाही आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आपलंसं केलेली ही चिमुकली आज आपल्यात नसली, तरीही तिच्या डोळ्यांमुळे एखाद्याला आयुष्याचा आनंद घेता यावा, यासाठी तिच्या वडिलांनी; अभिजित पाटील यांनी तिचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. निविताचे आजोबा हिम्मतसिंह पाटील यांनी ‘सकाळ’ला या निर्णयाची माहिती दिली. शिवाय, आपल्या लाडक्‍या नातीच्या अनेक हृदय आठवणींना पंच्याहत्तरीतल्या या आजोबांनी डोळ्यांतील पाण्यासह वाट करून दिली.

ते म्हणाले, ‘‘अतिशय मनमिळाऊ आणि लाघवी स्वभावाची होती आमची नात. भेटताक्षणी कुणालाही आपलंसं करणारी. बोलघेवडी अन्‌ तेवढीच हुशारसुद्धा ! ती आमच्यासोबत आता नाही, यावर विश्‍वास ठेवणं अजूनही कठीण आहे. परवाच शाळेत तिचा वाढदिवस साजरा केल्यानंतरचा तिचा आनंद आणि तिचे हावभाव आजही जसेच्या तसे माझ्या डोळ्यांपुढे आहेत. तिच्या जाण्याने आमच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कशी बरं भरून काढू ?’’

शेंगदाणे कोण खाणार ?
निविताच्या आठवणी सांगताना पाटील म्हणाले, ‘‘लहानगी निविता माझ्याशी नेहमी खेळायची. तिला माझ्याशी लपाछपी, पळापळी खेळायला आवडायचं. मी थकेपर्यंत ती मला खेळवत असे. मोठी खट्याळ होती ती. तिला आवडायचे म्हणून मी माझ्या कपाटात तिच्यासाठी आणि तिची मोठी बहीण इशितासाठी शेंगदाणे, चॉकलेट असा खाऊ ठेवत असे. ती ते आवडीने संपवत असे. आता मी हा खाऊ कुणासाठी ठेवू ? निविताचं जेवण तिच्या आजीशिवाय होत नसे. आजीने भरवलं, की ती पोटभर जेवायची. आपल्या मोठ्या बहिणीला जेव्हा आई अभ्यास करताना रागवायची, तेव्हा इवलीशी निविता आपल्या दिदूच्या बाजूने आईशी भांडायची.’’ 

मुलांकडे दुर्लक्ष नका करू !
पाटील म्हणाले, ‘‘मी सर्वांना आवर्जून विनंती करतो- कृपया आपल्या मुलांच्या बाबतीत तिळमात्रही दुर्लक्ष करू नका. अगदी नकळतपणेसुद्धा दुर्लक्ष घडणं धोक्‍याचं ठरू शकतं, हे लक्षात ठेवा. निविताच्या वडिलांना तरी कुठे माहीत होतं की, पाच मिनिटांसाठी ती नजरेआड झाली तर असं काहीतरी घडेल म्हणून ! पण, हा अपघात घडला खरा. आज आम्ही आमचं सर्वस्व गमावून बसलो. तुम्ही तरी यापुढे काळजी घ्या. मुलांची सुरक्षितता ही प्राधान्यानेच पाहा. त्यांना एकटं ठेवताना सर्व गोष्टींची पाहणी करा.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nivita posthumous eye donation