लग्नपत्रिकेतून फुलणार तुळस... 

लग्नपत्रिकेतून फुलणार तुळस... 

कोल्हापूर - विवाहात निमंत्रण पत्रिकेला खूप स्थान आहे, एकेक पत्रिका शंभर ते पाच सहाशे रूपयाची आहे. हौसेला मोल नसते. त्यामुळे लग्न पत्रिकेवरच हजारोचा खर्च होत आहे. अर्थात खर्चाचा हा मामला वैयक्तिक असला तरी सामाजिक जाणीवेतून तयार झालेली एक आगळी वेगळी आणि अत्यल्प खर्चाची लग्नपत्रिका कोल्हापूरात कौतुकाचा विषय झाली आहे.

लग्नसोहळ्यानंतर ही पत्रिका पाण्यात भिजवून एखाद्या कुंडीत टाकली की त्यातून तुळस फुलणार आहे. कारण या पत्रिकेचा कागद पर्यावरणपुरक आहे. आणि या कागदात तुळशीच्या बिया मिसळल्या आहेत. मातीत हा कागद व त्यासोबत बिया भिजत राहिल्या, की त्यातून फुलणारी तुळस एक वेगळा संदेश देणार आहे. 

लग्नपत्रिकेचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. पत्रिका किती महाग त्यावर स्टेटस्‌ ठरला जात आहे. लग्नाच्या बजेटमध्ये पत्रिका छपाईचे बजेट मोठे आहे. लग्न समारंभ झाल्यावर या पत्रिका म्हणजे घरातली एक समृद्ध अडगळ ठरत आहेत. कारण या पत्रिकावर (ओमचे चिन्ह) असतो. गणपती असतो, एखादा मंत्र असतो. त्यामुळे या पत्रिका कचऱ्यात टाकायचेही धाडस अनेकांना होत नाही. त्यामुळे बहुतेक घरात पत्रिका टेबलवर, टेबलखाली कपाटात, टीपॉयवर, खिडकीच्या कट्यावर, वृत्तपत्राच्या गठ्यात पडून असतात. इकडून पत्रिका उचलायची तिकडे ठेवायची, असा पत्रिकेचा घरातल्या घरात प्रवास चालू असतो. 

मात्र राजशेखर विरूपाक्ष तंबाके, मंदाकिनी तंबाके यांनी त्यांचा मुलगा आशिष यांच्या विवाहासाठी तुळशीचे रोप फुलवणारी पत्रिका काढली आहे. अजित पाटील व विजयालक्ष्मी पाटील यांची कन्या अवंती हिचेशी 26 जून रोजी हा विवाह होणार आहे. 
या विवाहाच्या पत्रिकेवरच ही पत्रिका पर्यावरण व निसर्गपूरक असल्याचा उल्लेख आहे. विवाहानंतर ही पत्रिका पाण्यात भिजवून मातीच्या कुंडीत कशी ठेवायची. याच्या सुचनाही त्यावर आहेत. त्यामुळे ही पत्रिका वाचून निम्म्याजणांनी जरी पत्रिका भिजवून मातीत ठेवली तरी किमान 500 घराती कुंडीत तुळस फुलणार आहे. पत्रिकेचा कागद कचऱ्यात न जाता मातीत विरघळून जाणार आहे. आशिष व अवंती यांच्या संसाराची वेल विवाहानंतर जशी फुलणार आहे. तसे तुळशीचे एक रोपटेही त्यांच्या स्नेही व मित्रपरिवारात फुलणार आहे. 

आशिष व अवंतीचा विवाहसोहळा निसर्गपुरक तर आहेच, पण बसव पद्धतीने होणार आहे. या विवाहात तांदुळाऐवजी पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे. पौराहित्य बसव केंद्र धारवाडच्या महिला करणार आहेत. लग्नातला अनावश्‍यक खर्च टाळून आम्ही बसव केंद्र व लिंगायत समाजाच्या सहकार्याने हा विवाह आयोजित केला आहे. 
- राजशेखर तंबाके, मंदाकिनी तंबाके 

स्टेजवर फक्त नवरा नवरी,आई वडील 
एरव्ही विवाहात स्टेजवर खूप गर्दी असते. हवसे नवसे दंगामस्ती करत असतात. मुला मुलीचे आईवडील बाजूलाच कोठे तरी उभे असतात. पण या लग्नात स्टेजवर फक्त नवरा नवरी व त्यांच्या आई वडिलांनाच स्थान दिले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com