सेवाभावातून वृद्धांना दिला जगण्याचा आधार

सेवाभावातून वृद्धांना दिला जगण्याचा आधार

कोल्हापूर - सेवाभावी वृत्तीला सामाजिक जाणिवेची जोड दिली की, त्यातून समाजसेवा घडते, याचे उदाहरण विमल सुतार यांनी घालून दिले आहे. वंदूर (ता. कागल) येथे ‘वृद्ध सेवाआश्रमा’च्या माध्यमातून त्या वृद्धांच्या जेवणापासून ते त्यांचे केस कापण्यापर्यंतची सेवा विनामोबदला करतात. डॉ. प्रकाश फाळके यांची त्यांना मोलाची मदत मिळते. हे वृद्धाश्रम स्वतःच्या जागेत उभे राहत आहे; पण त्याला गरज आहे, ती आर्थिक पाठबळाची. 

विमल वसंत सुतार. म्हटलं तर ही सामान्य महिला, पण आज करत असलेल्या कामामुळे ती निराधारांची ‘ताई’ बनली आहे. 
कानोली (ता. आजरा) सारख्या ग्रामीण भागात राहून समाजसेवेचे व्रत विमलताईंनी जपले आहे. गावात नवरा-बायकोचे भांडण असो वा गावातील बाळंतिणीची देखभाल किंवा मग आजारी व्यक्तीची सेवा; या कामांसाठी विमलताई नेहमीच पुढाकार घ्यायच्या. या कामाचा त्यांना मोबदला मिळत नव्हता; पण गावापासून ते पोलिस ठाण्यापर्यंत सर्व ठिकाणी त्यांना आदराचे स्थान होते. विमलताई काही दिवस उचगाव परिसरात राहण्यास आल्या आणि येथील एका पेट्रोल पंपाशेजारी त्यांना एक वृद्ध व आजारी अवस्थेतील महिला आढळली. त्यांनी तिला घरी आणून सेवा केली. त्यांची ही सेवाभावी वृत्ती डॉ. फाळके यांनी ओळखली व विमलताईंच्या समाजसेवेची वृत्ती

अनेकांसाठी आधार बनली. 
उचगाव येथे २०१२ ला सुरू झालेला ‘वृद्ध सेवाआश्रम’ आज वंदूर येथे ९ ते १० वृद्धांचा हक्काचा निवारा बनला आहे. यातील बहुतेक सर्वजण घरच्यांनी नाकारलेले. त्यामुळे त्यांच्या घरातून आर्थिक मदत मिळणे दुरापास्तच. डॉ. फाळके यांच्या आर्थिक मदतीतून व सामाजातील दानशूर लोकांच्या सहकार्यातून विमल सुतार यांचे हे काम अखंडपणे सुरू आहे. 

आश्रम जातोय हक्काच्या जागेत; पण...
वृद्ध सेवाआश्रम वंदूर येथील एका बंद पडलेल्या मिलमध्ये सुरू आहे. मात्र, विमलताईंचे काम पाहून वंदूर येथील अण्णासो इंगळे यांनी अल्प किमतीत आश्रमासाठी जागा दिली. दसऱ्याच्या मुहूर्तावर या आश्रमाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. दानशूरांच्या आर्थिक तसेच वस्तू स्वरूपातील मदतीच्या जोरावरच हा आश्रम उभा राहत आहे. आश्रम लवकर पूर्ण होण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे, असे विमल सुतार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com