श्रमदानातून ओळकाईवाडीचा कायापालट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

लोणावळा - गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की, गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे उदाहरण लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील ओळकाईवाडी. 

लोणावळा - गावविकासाचा ध्यास व तळमळ असली की, गावाचा कायापालट होऊ शकतो, याचे उदाहरण लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील ओळकाईवाडी. 

अनेक वर्षे असलेले निकृष्ट रस्ते, गलिच्छ गटारे, अस्वच्छ वस्तीचा कायापालट करण्याचा ध्यास युवकांच्या एका गटाने उचलला. कुसगाव बुद्रुक येथील स्थानिक नागरिक व युवकांच्या श्रमातून ‘श्रमदान नगरची’ उभारणी करत एक आदर्श निर्माण केला आहे. अंतर्गत सिमेंट काँक्रीटचा रस्ता, भूमिगत गटारे, स्ट्रीट लाइट, बसण्यासाठी बाक आणि रस्त्यालगत वृक्षारोपण अशी सुमारे एक कोटींचे काम नागरिकांच्या सहभागातून करत विकासाला हातभार लावला. स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

कुसगाव बुद्रुक येथील प्रभाग क्रमांक तीन मधील लोकसंख्या सुमारे बाराशेच्या आसपास आहे. गेली अनेक वर्षे हा भाग विकासापासून वंचित होता. येथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सूरज केदारी यांनी याबाबत पुढाकार घेत स्थानिक विकासासाठी जनजागृती करून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. श्रमदानातून गावामध्ये स्वच्छ ग्राम, घराघरांतून निघणाऱ्या सांडपाण्याचे योग्य नियोजन करून बंदिस्त गटारे तयार केली. गावात श्रमदान व लोकवर्गणी गोळा करून स्वच्छता, सौंदर्यीकरण, रस्ते, पाणी व इतर आवश्‍यक कामे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुनील शेळके, भाजेचे सरपंच चेतन मानकर, योगेश लोहार, अनंता गाडे, देवल पारेख, मारुती साठे, इब्राहिम खान, सोपान भंगाळे आदींनी मदतीचा हात दिला.

नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा - केदारी
नागरिकांचा सहभाग हा विकासासाठी महत्त्वाचा आहे. पैसे नसतानाही स्थानिकांनी पुढाकार घेऊन श्रमातून श्रमदान नगरची पायाभरणी केली, असे ग्रामपंचायत सदस्य सूरज केदारी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: olkaiwadi develop by labour donate motivation