अनाथ माकडाच्या पिलावर वच्छलाची माया

रामदास पद्मावार
मंगळवार, 18 एप्रिल 2017

भूतदयेचा नवा आदर्श

ही घटना आहे तालुक्‍यातील दिग्रस-दारव्हा रोडवरील बोरी (पुनर्वसन) या गावातील. रवी विलायतकर यांनी पिलाला त्यांची पत्नी वच्छला हिच्याकडे सोपवलं. त्यांनी त्याला जवळ घेऊन पाणी व दूध पाजून मायेची ऊब दिली...

दिग्रस (यवतमाळ) : आध्यात्म जगायला शिकवतं. दया, भूतदया शिकवतं. प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकवतं. परंतु आज-काल या गोष्टी नजरेआड केल्या जात असल्याचे आपण पाहतो. दिग्रस तालुक्‍यातील बोरी (पुनर्वसन) येथील विलायतकर कुटुंबीयांनी मात्र भूतदयेचा नवा आदर्शच घालून दिला आहे. अनाथ माकडाच्या पिलाला जीवदान देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी उचलली आहे. 

उन्हामुळे रानावनात वन्यजीवांना अन्न व पाणी मिळत नाही. त्यामुळे वन्यप्राणी गावाच्या दिशेने येतात. असाच माकडांचा एक कळप गावात आला. त्यातील एक माकडीन आपल्या पिलासह भटकली. गावातील कुत्रे तिच्या मागे लागले. आपला व पिलाचा जीव वाचविण्यासाठी ती विजेच्या खांबावर चढली. जिवंत वीजतारांचा स्पर्श झाल्याने जमिनीवर पडून तिचा जीव गेला. तिचं पिलू वाचलं. ते आपल्या आईच्या मृतदेहाला बिलगून आकांत करीत होतं. सभोवती माकडांची टोळी होती. मात्र, कुत्रे त्यांचा पिच्छा सोडत नव्हती...

(फोटो फीचर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

 ही घटना तेथून जाणाऱ्या रवींद्र विलायतकर यांच्या लक्षात आली. त्यांनी कुत्र्याला पिटाळून लावलं. चार दिवसांच्या त्या पिलाला आपल्या घरी आणलं. ही घटना आहे तालुक्‍यातील दिग्रस-दारव्हा रोडवरील बोरी (पुनर्वसन) या गावातील. रवी विलायतकर यांनी पिलाला त्यांची पत्नी वच्छला हिच्याकडे सोपवलं. त्यांनी त्याला जवळ घेऊन पाणी व दूध पाजून मायेची ऊब दिली. काही वेळाने पिलाचा आकांत थांबला. शांत होऊन ते वच्छलाबाईंच्या कुशीत विसावलं. विलायतकर दाम्पत्याने पिलाच्या देखभालीत कशीबशी रात्र जागून काढली. 'सकाळ' होताच त्यांच्या घराभोवती माकडांची टोळी जमली. 

त्यांनी अखेर माकडांना हाकलून त्या पिलाला वनविभागाच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ते पिलू वनविभागाच्या हवाली केले. मात्र, ते तेथे राहायला तयार नव्हते. तरीसुद्धा ते पिलाला सोडून निघून आले. मात्र, पिलाचा आकांत पाहिला जात नव्हता. चार दिवसांचे पिलू जंगलात सोडता येत नव्हतं. त्यामुळे वनविभागाने त्या पिलाला विलायतकर कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं. वच्छलाबाई व रवी विलायतकर यांनी त्या पिलाचा आनंदाने स्वीकार केला. पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. त्यांची चिमुकली पिलासोबत खेळते. वच्छलाबाई त्याला मुलाप्रमाणे वागवतात. 

घरातील कामे करताना त्यांच्या अंगाखांद्यावर पिलू खेळते. त्याही पिलाला नजरेआड होऊ देत नाहीत. रोज मजुरी करणाऱ्या वच्छलाबाईंनी त्या पिलाच्या पालनपोषणासाठी रोज मजुरीला जाणं सोडलं. पिलाला पाणी, दूध पाजणं व खाऊ घालणं त्यांनाच करावे लागते. दुधाचा खर्चही स्वत:च करावा लागत आहे. मुलाप्रमाणेच त्या माकडाच्या पिलाचाही हट्ट पुरवितात. घरात त्याच्यासाठी पाळणा बांधला. त्यात त्याला झोपी घालतात. विलायतकर कुटुंबाने दाखविलेलं भूतदयेचं हे औदार्य माणुसपणाचं जिवंत उदाहरणच म्हणावं लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: orphan monkey infant gets motherly love from vachhala