पहिल्याच पावसानंतर ओढ्यात मुबलक पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

पहिल्याच दमदार पावसाने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने शेती सिंचनाबरोबरच जेवळी पूर्व तांडा येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीची पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे सततच्या पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे आभार.
- रामा जाधव, शेतकरी, नाईक पूर्व तांडा, जेवळी

जेवळी - ‘सकाळ रिलीफ फंडा’तून व तनिष्का सदस्यांच्या पुढाकाराने जेवळी (ता. लोहारा) येथे ओढ्याच्या खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. पहिल्याच दमदार पावसानंतर ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीप्रश्‍न सुटणार असून, सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

जेवळीतील ग्रामस्थांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गावकऱ्यांना उन्हाळ्यात टॅंकरवरच तहान भागवावी लागते. गेल्या वर्षी तर वर्षभर दहा टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यामुळे दुष्काळावर शाश्वत  उपाययोजनेसाठी येथील युवकांनी एकत्र येत जलसंधारणाचे काम हाती घेतले होते. आता महिलाही तनिष्का गटाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरसावल्या आहेत. तनिष्का  सदस्यांनी पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेत ‘सकाळ माध्यम समूहा’कडे निधीची मागणी केली होती. येथील पाणीटंचाई लक्षात घेत ‘सकाळ रिलीफ फंडा’तून दोन लाख रुपये मदत मंजूर करण्यात आली. या निधीतून येथील पूर्व तांडा पाणीपुरवठा विहिरीजवळील ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरणाचे काम करण्यात आले. अवघ्या तीन आठवड्यांत हे काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले. ओढ्याचे ७२९ मीटर लांब तसेच सरासरी साडेसात मीटर रुंद व दोन मीटर खोलीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे सुमारे ९५ लाख ६५ लिटर पाणीसाठा होणार आहे. 

दरम्यान, जेवळी परिसरात बुधवारी (ता. ७) पहाटे मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील नदी-नाले वाहते झाले. त्यामुळे ओढ्यात निर्माण केलेल्या चरीत आता मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकेचा पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्‍नही सुटणार आहे. शेती सिंचनाखाली येण्याबरोबर पूर्व तांड्यासाठी असलेल्या पाणीपुरवठा विहिरीला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली आहे. सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी शाश्वत उपाययोजनेसाठी जलसंधारणाच्या कामासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे ग्रामस्थांनी आभार मानले.

जलसंधारणाच्या व्यापक चळवळीसाठी ’सकाळ माध्यम समूहा’कडून होत असलेले हे कार्य कौतुकास्पद आहे. जेवळीच्या ओढ्याचे रुंदीकरण, खोलीकरणाने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होणार आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.
- बसवराज कारभारी, उपसभापती, बाजार समिती, मुरूम.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: osmanabad news rain sakal relief fund