बहिष्कृत कुटुंबाचा तब्बल २० वर्षांनी स्वीकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

आंतरजातीय विवाह केला म्हणून बहिष्कार घातलेल्या जोडप्याचा तब्बल वीस वर्षांनी तेलुगू मडेलवार धोबी समाजात समावेश करून घेण्यात आला.

पुणे - आंतरजातीय विवाह केला म्हणून बहिष्कार घातलेल्या जोडप्याचा तब्बल वीस वर्षांनी तेलुगू मडेलवार धोबी समाजात समावेश करून घेण्यात आला.

याबाबत खडकी न्यायालयात दाखल असलेला खटला तडजोडीतून मिटविला. बहिष्कार घातलेल्या जोडप्याचा बुधवारी समाजात समावेश करून घेण्यात आला. या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, समाजाचे अध्यक्ष गणेश निमकर उपस्थित होते. याबाबत सविस्तर माहिती अशी, की अजित चिंचणे यांनी १९९९ मध्ये आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे त्यांना समाजाचे सभासद करून घेण्यास तेलुगू मडेलवार धोबी समाजाच्या जात पंचांनी नकार दिला होता. त्यामुळे चिंचणे यांनी २३ सप्टेंबर २०१७ रोजी खडकी पोलिस ठाण्यात नऊ पंचांविरुद्ध तक्रार दिली होती. 

याबाबत देशमुख आणि जाधव यांनी सांगितले, की या प्रकरणात तडजोड  व्हावी, अशी इच्छा चिंचणे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्ती केली होती. त्यानुसार ‘अंनिस’च्या माध्यमातून चिंचणे कुटुंबीय आणि पंच यांच्यात बैठका झाल्या. त्या वेळी पंचांनी फिर्यादी व सर्व बहिष्कृत कुटुंबीयांना सभासद करून घेण्याचे व सन्मानाने वागविण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार खडकी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. ए. दरवेशी यांच्या न्यायालयात ॲड. सुनील जपे यांनी तडजोडनामा सादर केला. त्यातून मिटलेला हा राज्यातील पहिलाच खटला आहे.

तेलुगू मडेलवार धोबी समाजातील सुमारे ७६ कुटुंबे अद्याप बहिष्कृत आहेत. या तडजोडीमुळे या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.  
- नंदिनी जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा, अंनिस 

बहिष्कार घातल्याने गेल्या २० वर्षांत आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ‘अंनिस’च्या भूमिकेमुळे पंचांनी सामंजस्य दाखवत आम्हाला पुन्हा समाजात घेतले. 
- अजित चिंचणे, बहिष्कृत कुटुंबातील सदस्य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outcast Family Accept Intercaste Marriage Humanity Motivation