चित्राविष्कारातून सजविल्या सुंदर भिंती..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

कोल्हापूर - वय बहात्तर, पण सळसळत्या उत्साहाचा हा माणूस जणू एक झराच. ते एक विद्यार्थिप्रिय कलाशिक्षक आणि सेवानिवृत्तीनंतरही आता ते समाजाचे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कुंचल्यातून एकाहून एक सरस कलाकृती साकारतात आणि त्या कलाकृती विविध सामाजिक संदेश देतात.

कोल्हापूर - वय बहात्तर, पण सळसळत्या उत्साहाचा हा माणूस जणू एक झराच. ते एक विद्यार्थिप्रिय कलाशिक्षक आणि सेवानिवृत्तीनंतरही आता ते समाजाचे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कुंचल्यातून एकाहून एक सरस कलाकृती साकारतात आणि त्या कलाकृती विविध सामाजिक संदेश देतात. त्यांच्याच चित्राविष्कारातून धरतीमाता हौसिंग सोसायटी परिसरातील भिंतींचे रूपडे आता पालटले आहे. निवृत्त कलाशिक्षक व चित्रकार आर. एस. कुलदीप यांची ही सेवापरायणता. 

श्री. कुलदीप यांनी शाळेत अनेक कलाविषयक उपक्रम राबविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ कलाकारच नव्हे, तर त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशौलौकिकाचे शिलेदार झाले. कोल्हापूरच्या कलाचळवळीत ते सतत अग्रेसर राहिले आहेत. राजर्षी शाहू स्मारक भवनात भरणारी विविध प्रदर्शने असोत किंवा एखाद्या सामाजिक प्रश्‍नावर झालेल्या आंदोलनातही त्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतींनी जागर मांडला. शिंगणापूर येथील राजर्षी शाहू विद्यानिकेतन ही शाळा म्हणजे त्यांची खऱ्या अर्थाने कर्मभूमी. २००५ मध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे शाळेत जाणे थांबले. मात्र, आजी-माजी विद्यार्थ्यांशी त्यांचा स्नेह आजही आहे.

सेवानिवृत्तीनंतर काय करायचे, असा प्रश्‍नच आपल्यासमोर उभा राहता कामा नये. माझ्याकडे कला आहे आणि त्या माध्यमातून मी समाजासाठी जेवढे काही करता येईल तेवढे येत्या काळातही स्वखर्चाने करत राहणार आहे.
- आर. एस. कुलदीप

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी समाजासाठीच काम करायचे ठरवले आणि मग त्यांची चित्रं, व्यंग्यचित्रं कधी महागाई, दुष्काळ, भ्रष्टाचार, वाढता दहशतवाद अशा विविध विषयांवर थेट भाष्य करू लागली. कोल्हापुरातील विविध प्रश्‍नांवरही त्यांनी थेट प्रहार केला. आता त्यांनी त्यांच्या धरतीमाता हौसिंग सोसायटीचा परिसर कलाकृतींनी सुंदर बनवण्याचा ध्यास घेतला आहे. त्याशिवाय याच परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनाही ते चित्रकलाविषयक मार्गदर्शन करीत असतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Painter R S Kuldeep special story