शेतकऱ्याच्या पोराने लिहिली इंग्रजी कादंबरी!

Pandurang-More
Pandurang-More

सोलापूर - आईचे शिक्षण नाही, वडिलांची जेमतेम चौथी झालेली, स्वतःच्या शेतीत राबणारा, शेतातली नांगरणी, कुळपणी असो की खुरपणी अगदी वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतावरही मजुरीसाठी जाणाऱ्या पानगाव (ता. बार्शी) येथील पांडुरंग तानाजी मोरे या तिशीतल्या तरुणाने इंग्रजी कांदबरी लिहून सीमोल्लंघन केले आहे. ‘किंगडम इन ड्रीम दी प्राइममिनिस्टर’ असे या कादंबरीचे नाव आहे. सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर अचूक बोट ठेवताना शेतकऱ्यांचे दुःख रोज भोगणाऱ्यां पांडुरंगने या कादंबरीत सामान्य शेतकरी कुटुंबाचं जगणं मांडलं आहे. अमेरिकेतील न्युयॅार्कस्थित प्रसिद्ध अशा पारट्रि्ज पब्लिकेशनने ती प्रकाशित केली आहे. सध्या ही कादंबरी थेट अॅमेझॅान आणि फ्लिपकार्टसारख्या अॅानलाइन पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पांडुरंगचे वडील तानाजी हे शेती करतात. त्यांची स्वतःची आठ एकर शेती आहे. पांडुरंग हा त्यांचा एकुलता एक मुलगा, मुलाने भरपूर शिकावं आणि नोकरी करावी, अशी त्यांची अपेक्षा. जिद्दी आणि कष्टाळू पांडुरंगने पुढे इंग्रजी विषयातच २०१२ मध्ये एम.ए.बीडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बार्शीतील एका खासगी महाविद्यालयात सहायक प्राध्यापकाची नोकरीही पत्करली. पण मिळणारा पगार आणि प्रत्यक्षातलं वास्तव याचा हिशेब त्याच्या लेखी जुळेना, अवघ्या वर्षभरातच त्याने ही नोकरी सोडली आणि थेट स्वतःच्या शेतात राबण्याचा निर्णय घेतला. 

शेती करत लिखाण करण्याचा निर्णय पांडुरंगने घेतला. तोही इंग्रजी पुस्तकांचा. शेतातल्या वस्तीवर पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्यातील लेखकाला साद घालू लागला. विचाराचं काहूर मनात साठवू लागला. शेतातील नांगरणी, पेरणी, कुळपणी असो की खुरपणी तसेच जनावरांचा व्याप सांभाळत पांडुरंग लिहित राहिला. आजही पांडुंरग शेतात आई-वडिलांबरोबर शेतातल्या कामात व्यस्त असतो, कामे झाल्यानंतर किंवा फावल्या वेळेत तो आपलं लिखाण करतो. त्यातूनच दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ‘किंगडम इन ड्रीम दी प्राइम मिनिस्टर’ ही कादंबरी त्याने लिहिली.

...आता ‘व्हाइटमनी’ही लवकरच
‘किंगडम इन ड्रीम’नंतर शेतकरी आत्महत्या आणि एकूणच देशातील राजकीय, सामाजिक परिस्थितीवर प्रहार करणारे ‘व्हाइट मनी’ हे पुस्तक पांडुरंगने लिहून तयार केले आहे. लवकरच ते प्रकाशित होईल. त्याशिवाय ‘द डार्क वे’ आणि ‘द बर्थडे गिफ्ट’, ‘हजबंड टेक्स हजबंड’ ही तीन नाटके आणि ‘लिडरशीप अॅाफ अ सो’ आणि ‘आय आस्क फ्रिडम’ ही दोन कवितासंग्रहही तयार आहेत.

अॅमेझॅान, फ्लिपकार्टवर उपलब्ध
न्युयॅार्कस्थित पारट्रीज पब्लिकेशनने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. ४०० पानांच्या या कादंबरीची किंमत ४९९ रुपये आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना ही समर्पित केली आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी २० अॅागस्टला ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. सध्या अॅमेझॅान, फ्लिपकार्ट आणि बार्न्स अॅँड नोबेल यांसारख्या अॅानलाइन पोर्टलवर ही कादंबरी विक्रीस उपलब्ध आहे.

 पानगावचा अवघा तिशीतला पांडुरंग मोरे लेखक
 अमेरिकेच्या पारट्रीज पब्लिकेशनकडून प्रकाशित
 किंगडम इन ड्रीम दी प्राइममिनिस्टर मध्ये शेतकरी कुटुंबाच्या जगण्याची मांडणी
 अॅमेझॅान, फ्लिपकार्टसारख्या अॅानलाइन पोर्टलवर कांदबरी विक्रीसाठी उपलब्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com