पॅराग्लायडिंगमुळे तरुणाईची भरारी

रामदास वाडेकर 
Monday, 16 March 2020

मावळातील तरुणाईला पॅराग्लायडिंग पायलट म्हणून रोजगाराचे क्षेत्र खुले झाले असून, ही बाब मावळवासीयांच्या मनाला निश्‍चित उभारी देणारी आहे.

कामशेत - पॅराग्लायडिंग या साहसी खेळामुळे कामशेतचे नाव जगाच्या नकाशावर झळकले आहे. या साहसी खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी गोवित्री पंचक्रोशीतील तरुण परदेशात जाऊन आले आहेत. मावळातील तरुणाईला पॅराग्लायडिंग पायलट म्हणून रोजगाराचे क्षेत्र खुले झाले असून, ही बाब मावळवासीयांच्या मनाला निश्‍चित उभारी देणारी आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गडकिल्ले, सह्याद्रीचा कडेपठार हेरिटेज वॉकसाठी प्रसिद्ध आहे. पॅराग्लायडिंग स्कोअरिंगसाठी हे नाव जगाच्या नकाशावर उमटले आहे. १९९७च्या सुमारास संजय राव, अवी मलिक, संजय पेंडूरकर यांनी याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या अनुभवातून हा खेळ बहरत गेला. ‘एक्‍स्ट्रीम ॲडव्हेंचर स्पोर्टस’मध्ये या खेळाची गणना होते. जगभरातील डोंगरदऱ्या आणि कडेकपारातील पठारावरचा हा खेळ आहे. याचे प्रशिक्षण घेतले की खेळाडूला आकाशात मुक्तविहार करता येतो. तानाजी टाकवे हा तरुण मावळातील पहिला पॅराग्लायडिंग पायलट ठरला. त्यानंतर रवींद्र शेलार, पंकज गुगळे, सचिन जाधव, गणपत नेवाळे, पप्पू शेटे यांच्यासह करंजगाव, गोवित्री, नाणे, उकसाण, जांभवली, थोरण, कांब्रे येथे सत्तर प्रशिक्षक आहेत.

हवेचा दाब हा या खेळपट्टीवरचा महत्त्वाचा दुवा आहे. स्थिर हवेचा कल या खेळाची रंगत अधिक वाढवतो. अस्थिर हवेत कसलेल्या खेळाडूंना तोल सांभाळून कौशल्य दाखवावे लागते. हवेची दिशा, वेग आणि वातावरणातील तापमान, याच्यावर पॅराग्लायडर किती उंचीवर उडवायचे, हे ठरते. समुद्र सपाटीपासून दीड हजार मीटर उंचीवर दहा ते पंधरा मिनिटांची हवेतील ही सफर अनुभवता येते. प्रशिक्षित खेळाडू दोन ते चार तास ही सफर करू शकतो. पॅराग्लाडिंगमुळे मनाची एकाग्रता वाढते, धाडस वाढते.

या प्रशिक्षकांना पंधरा ते वीस हजार रुपये मानधन मिळते. जगाच्या तुलनेत सर्वांत कमी मानधनावर येथे प्रशिक्षण दिले जाते. मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळूरसह हिवाळ्यात युरोप, कॅनडा, अमेरिका, स्वीडनमधून पर्यटक येतात. प्रशिक्षकासह हॉटेल्स, टेंट कॅम्प, कृषी पर्यटन केंद्र, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहन चालक-मालकांना यातून रोजगार मिळाला आहे.

कुसगावचा टॉवर हिल, करंजगावचा शेलार हिल, ठाकूरसाईचा पवना हिल आणि वडगावची शिंदे टेकडी पॅराग्लायडिंगच्या उड्डाणाची प्रमुख ठिकाणे आहेत. तेथे पॅराग्लायडिंगप्रेमींची मांदियाळी असते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जानेवारी २००८ मध्ये संजय राव यांच्या कॅम्पसमध्ये राहून करंजगावच्या शेलार हिल येथे तीन दिवसांचे पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतले होते. 

विरार येथील पर्यटक पराग बारी म्हणाले, ‘‘येथील प्रशिक्षण सुरक्षित वाटले. सह्याद्रीचा हा परिसर न्याहाळताना खूप आनंद झाला.’’

उपसभापती दत्तात्रेय शेवाळे म्हणाले, ‘‘स्थानिकांना यातून रोजगार मिळाला आहे. सरकारने पर्यटनवाढीसाठी मूलभूत सुविधा द्याव्यात. प्रशिक्षकांना अनुदान मिळावे.’’

मी सोळा वर्षांपासून प्रशिक्षण देत आहे. आत्मविश्वास, सकारात्मकता वाढली. परदेशात जाऊन परदेशी पर्यटकांना पॅराग्लायडिंगचे धडे शिकवता आले. त्यातून रोजगाराचे साधन मिळाले.
- पंकज गुगळे, प्रशिक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paragliding pilot for youth in Maval