मानलं! दुर्घटनेतील 13 अनाथ बालकांचं पालकत्व 'भोई'ने स्वीकारलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koynanagar Friendship Project

सामाजिक बांधिलकी जपत पुण्यातील भोई प्रतिष्ठानने त्यांचे वैद्यकीय मदत पथक मदतीला आणले आहे.

मानलं! दुर्घटनेतील 13 अनाथ बालकांचं पालकत्व 'भोई'ने स्वीकारलं

कऱ्हाड (सातारा) : पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर येथील भूस्खलनात (Patan Taluka Landslide) अनाथ झालेल्या १३ बालकांचे शैक्षणिक पालकत्व पुण्याच्या भोई प्रतिष्ठानने (Bhoi Pratishthan Pune) स्वीकारले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलींद भोई, त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पनेतून कोयनानगर मैत्री प्रकल्प (Koynanagar Friendship Project) कोयनेत सुरु केला आहे. दुर्घटनेनंतरचा रक्षाबंधन पहिला सण आपत्तीग्रस्तांसोबत प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनासोबत पुण्यात साजरा करणार आहे. प्रतिष्ठाननने प्रत्यक्ष लोकांच्या भेटी घेवून मुलांची माहिती घेतली आहे.

कोयनानगर येथे भोई प्रतिष्ठा सात दिवसांपासून कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत पुण्यातील भोई प्रतिष्ठानाने त्यांचे वैद्यकीय मदत पथक मदतीला आणले आहे. कोयनानगर परिसरातील पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत. राज्यभरातून जीवनावश्यक वस्तूंची मदत येत आहे. परंतु ज्यांनी प्रियजन दुर्घटनेत गमावले आहेत, त्यांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी भोई प्रतिष्ठान पुढे सरसावले आहे. अशा अस्मानी संकटाने त्यांना खूप मानसिक धक्का बसला आहे. त्यांना नव्याने उभे करण्यासाठी भोई प्रतिष्ठानतर्फे कोयनानगर मैत्री प्रकल्प’ सुरु केला आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर्स यांचा त्यात समावेश आहे.

हेही वाचा: माणुसकीचं दर्शन! दरड कोसळलेल्या आंबेघरला 'जमियत'चा आधार

भूस्खलग्रस्त मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ज्यांचे पालक दुर्घटनेत गमावले आहेत, त्यांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानने स्वीकारले आहे. शिक्षणासाठी लागणाऱ्या योजना संस्थेतर्फे राबविल्या जाणार आहेत. त्या मुलांच्या शिक्षणासह अन्य सेवा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्याचा शुभारंभ रविवारी (ता. २२) रक्षाबंधनाच्या दिवशी पुण्यात होणार आहे. भूस्खलनग्रस्त गावातील बांधवांना, छोट्या मुलांना राखी बांधल्या जाणार आहेत. दुर्घटनेनंतर त्यांचा पहिला सण येतो आहे. त्यामुळे त्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे अश्रू  पुसण्यासह त्यांना पुन्हा जिद्दीने व जोमाने उभे करण्याचा संकल्प भोई प्रतिष्ठानने केला आहे. कोयनानगर परिसरातील आपत्तीग्रस्त गावे शिरगाव, हुंबरळी, ढोकावले ग्रामस्थ व विद्यार्थी रक्षाबंधनात सहभागी होऊन एका अनोख्या नात्यात बांधले जाणार आहेत, अशी माहिती डॉ. भोई यांनी दिली.

Web Title: Patan Taluka Landslide Bhoi Pratishthan Accepted The Cost Of Education Of 13 Orphan Children

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top